सीईओंच्या प्रयत्नाने पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत. -- नागेपल्ली आलापल्ली वासियांना मिळाले तीन महिन्यानंतर पाणी

 सीईओंच्या प्रयत्नाने पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत.
-- नागेपल्ली आलापल्ली वासियांना मिळाले तीन महिन्यानंतर पाणी


गडचिरोली ,
नळ योजनेच्या थकित विद्यूत बिलाचा भरणा न केल्याने महावितरणने वीज खंडित करीत अहेरी मुख्यालगतच्या आलापल्ली, नागेपल्ली येथील पाणी पुरवठा योजना बंद पाडली. यामुळे या दोन्ही गावातील नागरिकांची तीन महिन्यांपासून भर पावसात पाण्यासाठी होणारी फरफट लक्षात घेत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी  आंदोलनाचा इशारा देत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला होता. याची दखल घेत जिप सीईओ आयुषी सिंग यांनी तत्काळ प्रशासकीय हालचाली करुन दोन्ही गावातील पाणी पुरवठा योजना पुन्हा कार्यान्वीत केल्या. यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर नागरिकांना नळाचे पाणी उपलब्ध झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
वीजेचा भरणा न केल्याने महावितरणने आलापल्लीसह नागेपल्ली येथील नळ योजनेची विद्यूत सेवा कपात केली. त्यानंतरही संबंधित प्रशासनाने विजेचा भरणा न केल्याने तब्बल तीन महिने पाणी पुरवठा योजना ठप्प पडली होती. यामुळे भर पावसाळ्यात दोन्ही गावातील हजारो नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु होती. या गंभीर बाबीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी नळ योजना कार्यान्वीत करण्यासाठी प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला. तसेच प्रशासनाने तत्परता न दाखविल्यास नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. या गंभीर बाबीची दखल जिप सीईओ आयुषी सिंग यांनी घेत प्रत्यक्ष दोन्ही गावांना भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करीत संबंधित विभागाच्या अधिका-यांना थकीत वीज बिल भरणा करण्याचे निर्देश दिले होते. तसेच यासंदर्भात सीईओ यांनी जिल्हाधिका-यांशी यासंदर्भात चर्चा करुन नळ योजना सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला. याअंतर्गत जिल्हाधिका-यांनी महावितरणला सदर योजना सुरु करण्याचे निर्देश दिले. याअंतर्गत तत्काळ महावितरणने सदर योजना सुरु केली. यामुळे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर नागेपल्ली व आलापल्ली ग्रापं हद्दीतील नागरिकांना नळाद्वारे पाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments