आशिष पिपरे व माजी संचालकांचा आरोप
गडचिरोली : चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत जिल्हा उपनिबंधकासह बाजार समितीच्या सचिवाने पदाचा दुरूपयोग करून संचालक व सभापतीची नियमबाह्य निवड केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपचे जिल्हा महामंत्री तथा चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे यांच्यासह इतर नागरिकांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
यावेळी पिपरे यांच्यासह याचिकाकर्ता आणि बाजार समितीचे माजी संचालक अशोक धोडरे, तुळशिदास नैताम, रमेश अधिकारी व विनोद किरमे यांनी कैफियत मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीदरम्यान अतुल गण्यारपवार, अमोल गण्यारपवार, कांताबाई आभारे, अभिजित बंडावार आणि इतर काही उमेदवारांच्या अर्जावर रितसर पुराव्यासह आक्षेप घेण्यात आले, परंतू तत्कालीन जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी नियमबाह्यपणे अर्ज वैध ठरविल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान विभागीय सहनिबंधकांकडे अपिल केल्यानंतर त्यांनी चौघांचेही अर्ज बाद ठरविले. उच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला.
उच्च न्यायालयाने अपात्र ठरविलेल्या व्यक्तिला स्वीकृत सभासद म्हणून नियुक्त करता येत नाही, असा नियम असताना बाजार समिती संचालकांनी व सचिवांनी संगनमताने अतुल गण्यारपवार यांना स्विकृत सदस्य बनविण्याचा मनमानी ठराव पारित केल्याचा आरोप पिपरे यांनी केला. एवढेच नाही तर ३० आॅगस्टला झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांचाच अर्ज भरला. परंतू निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला.
आशिष पिपरे यांनी यापूर्वीच्या प्रकरणाचा दाखला देत गण्यारपवार यांच्यासह ४ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने आमच्या गटाच्या ४ उमेदवारांची अविरोध निवड होणे अपेक्षित होते, परंतू तसे न करता कलमाचा दुरूपयोग करणाऱ्या संचालक मंडळावर आणि सचिवावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
0 Comments