निसर्गरम्य गडचिरोलीमध्ये विषारी धुराचे साम्राज्य! वारंवार कचरा जाळपोळ; तक्रारींकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष - नगरसेवक श्रीकांत शरदराव देशमुख
गडचिरोली ,
निसर्गसौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत पर्यावरणाला काळिमा फासणारा प्रकार सातत्याने घडत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. नगरपालिकेच्या हद्दीतील घनकचरा संकलन आरमोरी रोडवरील खरपुंडी नाक्या येथे करण्यात येते. ठेकेदारामार्फत कचरा व्यवस्थापन करून त्यापासून खत निर्मिती करणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी वारंवार कचरा सर्रास जाळला जात असल्याचा आरोप होत आहे.
ही बाब नगरसेवक श्रीकांत शरदराव देशमुख यांनी उघडकीस आणत प्रशासनाला थेट जाब विचारला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्लास्टिकसह विविध कचरा उघडपणे जाळण्यात येत असून त्यामुळे परिसरात दाट व विषारी धूर पसरतो. या धुरामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहेत, तर दूरवरपर्यंत पसरलेल्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात जळालेल्या कचऱ्याचे अवशेष स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, आग भडकत असल्याने अग्निशमन दलाकडून ती वारंवार भिजवून विझवली जाते; मात्र काही काळानंतर पुन्हा त्याच ठिकाणी आग लागल्याचे आढळते, असा आरोप आहे. त्यामुळे हा प्रकार अपघाती नसून जाणीवपूर्वक केला जात आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, या प्रकाराची माहिती नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार देऊनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारींची दखल न घेणे म्हणजे संबंधितांना मूकसंमती आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच त्या ठिकाणी कोणताही सुरक्षारक्षक नसल्याचेही उघडकीस आले आहे.
रहिवाशांनी अनेक तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने संताप तीव्र झाला आहे. प्रश्न उपस्थित होतो — कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली जाळपोळ करून जबाबदारी झटकली जात आहे का?
नगरसेवक देशमुख यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई न झाल्यास संबंधित ठेकेदाराविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येईल.
निसर्गरम्य गडचिरोलीत वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे पर्यावरण, कायदा आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने कठोर हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

0 Comments