राष्ट्रीय सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहीम; ‘अरुणोदय अभियाना’चा गडचिरोलीत शुभारंभ
गडचिरोली
राष्ट्रीय सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत गडचिरोली जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत सिकलसेल अॅनिमिया तपासणी, निदान व उपचारासाठी विशेष ‘अरुणोदय अभियान’ राबविण्यात येत आहे.
या विशेष मोहिमेचा औपचारिक शुभारंभ गडचिरोली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष निबोंरकर म्हणाल्या की, सिकलसेल अॅनिमिया हा गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यासाठी गंभीर आरोग्याचा प्रश्न असून, या आजारावर तातडीने आणि प्रभावी नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या अंदाजे ३० हजारांहून अधिक सिकलसेल रुग्ण असल्याचे निदर्शनास आले असून, या आजारामुळे अनेक कुटुंबांवर आरोग्याबरोबरच आर्थिक ताणही पडत आहे. या मोहिमेद्वारे प्रत्येक रुग्णाची अचूक ओळख पटवून त्यांना वेळेवर आणि योग्य उपचार देणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष निबोंरकर यांनी नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करताना सांगितले की, सिकलसेलवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिक यांचा एकत्रित प्रयत्न गरजेचा आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे सज्ज ठेवून सर्वसमावेशक तपासणी, निदान आणि उपचाराची व्यवस्था उभी केली आहे. नागरिकांनी आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन सिकलसेल तपासणी करून घ्यावी व आवश्यक ते उपचार सुरू करावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
नगराध्यक्ष प्रणोती सागर निबोंरकर म्हणाल्या,
“सिकलसेल मुक्त गडचिरोली हे आपले सामूहिक ध्येय असले पाहिजे. या अभियानाच्या माध्यमातून रुग्णांची वेळेवर ओळख करून त्यांना योग्य उपचार देऊन आपण निश्चितच या आजारावर मात करू शकतो.”
या ‘अरुणोदय अभियाना’द्वारे सिकलसेल अॅनिमियावर प्रभावी नियंत्रण, जनजागृती वाढवणे आणि जिल्ह्यातील आरोग्य सेवांची गुणवत्ता अधिक सक्षम करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

0 Comments