ग्रामपंचायतीच्या बेफिकीरीविरोधात ग्रामपंचायत सदस्याचा अनोखा निर्णय
गावच्या स्वच्छतेसाठी करणार "भीक मागणी"
एटापल्ली
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावात गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाले तुंबलेले, गटारे कचऱ्याने भरलेले, रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य व कुजलेल्या कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी अशा बिकट परिस्थितीत गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर प्रश्नावर ग्रामपंचायतीकडून वारंवार तक्रारी व निवेदन करूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य मुकेश वामन कावळे यांनी एक धक्कादायक पण अनोखा निर्णय घेतला आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत जर निधी उपलब्ध करून देत नसेल, तर रविवारी जारावंडी येथे भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजारात ते स्वतः भीक मागून निधी जमा करतील आणि ती रक्कम ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करतील, असे त्यांनी जाहीर केले आहे.
कावळे यांनी या संदर्भात ग्राम पंचायत ,व पोलीस स्टेशन, जारावंडी यांना अधिकृत अर्ज देऊन आपला निर्णय लेखी स्वरूपात कळविला आहे. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, ग्रामपंचायतीच्या बेफिकीरीमुळे गावात मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा उद्रेक होण्याचा धोका आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असताना प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याने ही टोकाची भूमिका घ्यावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ग्रामपंचायत विकासाच्या नावाने लाखो रुपयांचा निधी खर्च करते, पण गावाची मूलभूत स्वच्छता करण्यासाठी एक रुपया खर्च करायला तयार नाही. त्यामुळे सदस्यांचा हा निर्णय ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर चपराक आहे,"
आता रविवारी होणाऱ्या या "भीक मागणी
आंदोलनाकडे" केवळ जारावंडीच नाही तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत प्रशासन आपली भूमिका बदलून तात्काळ कारवाई करणार की हा प्रकार आणखी मोठ्या आंदोलनाला तोंड फोडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0 Comments