रोजंदारी भरती प्रक्रिया पारदर्शक करा – स्थानिकांना प्राधान्य देण्याची AIYF ची ठाम मागणी
एटापल्ली,
एकात्मिक विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत वर्ग-४ संवर्गातील बहुउद्देशीय पदे (शिपाई, सफाईगार, कामाठी, चौकीदार, स्वयंपाकी) भरताना स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF) च्या गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
AIYF चे राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी मा. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक विकास प्रकल्प भामरागड यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली. एटापल्ली येथील वसतिगृहातील पदांसाठी ०१ ते ०३ जुलै २०२५ दरम्यान अर्ज मागवण्यात आले होते. अनेक स्थानिक उमेदवारांनी अर्ज सादर केले. दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी मुलाखत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप कोणतीही मुलाखत झालेली नाही, तसेच उमेदवारांना पुढील कार्यवाहीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर AIYF ने स्पष्ट भूमिका घेतली आहे की, स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. वसतिगृहात रोजंदारी पदे भरताना त्या ठिकाणच्या बेरोजगारांना प्राधान्य मिळालं पाहिजे.
निवेदनात AIYF ने भरती प्रक्रिया त्वरित राबवून प्रलंबित मुलाखतींचे आयोजन करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य पद्धतीने व्हावी, स्थानिक पात्र उमेदवारांनाच संधी मिळावी यासाठी चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, ही संघटनेची आग्रही मागणी आहे.
शासनाच्या योजनांचा खरा लाभ स्थानिक गरजू तरुणांना मिळालाच पाहिजे. अन्यथा, आम्हाला जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा AIYF च्या वतीने देण्यात आला आहे.
0 Comments