१ नोव्हेंबर ला गडचिरोली येथे विराट मोर्चा डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे भाई रामदास जराते यांचे आवाहन


१ नोव्हेंबर ला गडचिरोली येथे विराट  मोर्चा डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे 

भाई रामदास जराते यांचे आवाहन 
गडचिरोली : 
सदोष मतदार याद्या दुरुस्त करून अद्ययावत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, या मागणीकरिता येत्या १ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या कार्यालयावर महाविकास आघाडी - मनसेने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील डावे पक्ष, हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असून, या मोर्चात मोठ्या संख्येने भागीदारी करण्याचा निर्णय डाव्या पक्षांमी एकमताने घेतला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील डाव्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केले आहे.

भारतीय शेतकरी कामगार पक्षच्या फोर्ट येथील कार्यालयात शनिवार दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी डाव्या पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली, या बैठकीत राज्यव्यापी प्रचार मोहीम राबवून या मोर्चात, मोठ्या संख्येने भागीदारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मतदार याद्यातील दुबार नावे, इतर ठिकाणची घुसडलेली नावे, अस्तित्वात नसलेले आणि अपूर्ण पत्ते, वय आणि लिंगातील तफावती, मतदार यादीत फोटो नसणे तसेच मागील वर्षभरापासून वयाची अठरा वर्षं पूर्ण करणाऱ्या तरुणांना सरसकट मताधिकार नाकारणे या आणि अशाप्रकारच्या अनेक दोषांनी सदोष झालेल्या मतदार याद्यांचा वापर करून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे म्हणजे लोकशाहीची घोर थट्टा आहे. संविधानाने दिलेल्या अमूल्य अशा मताधिकारावर दिवसा उजेडी घातलेला दरोडा आहे. राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यंनी निवडणूक यंत्रणांना हाताशी धरून ही निवडणूक एकतर्फी करण्याचा कट आखला आहे, आणि म्हणूनच मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणूक नको, ही भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम या मोर्चाच्या तयारीकरीता राबविण्यात येणाऱ्या राज्यव्यापी प्रचार मोहिमेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

डाव्या पक्षांच्या या बैठकीला भाई जयंत पाटील, भाई प्रा. एस. व्ही. जाधव आणि भाई ॲड. राजेंद्र कोरडे (शेतकरी कामगार पक्ष), कॉम्रेड शैलेंद्र कांबळे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), कॉम्रेड प्रकाश रेड्डी (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), कॉम्रेड किशोर ढमाले (सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष), कॉम्रेड श्याम गोहिल आणि कॉम्रेड दत्तू अत्याळकर (CPI -ML, लिबरेशन), कॉम्रेड किशोर कर्डक (फॉरवर्ड ब्लॉक) हे डाव्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कॉम्रेड डॉ. भारत पाटणकर (श्रमिक मुक्ती दल) आणि इतर अनेक डाव्या पुरोगामी पक्ष संघटनांनी या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असून सदरचा मोर्चा व्यापक करण्यासाठी डाव्या मित्रपक्षांनी तयारीला लागावे असे आवाहनही शेकाप नेते भाई रामदास जराते, जयश्रीताई वेळदा, भाई शामसुंदर उराडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. सचिन मोतकुरवार, काॅ. सुरज जक्कूलवार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments