अहेरी-आलापल्ली रस्ता बांधकामाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा - संतोष ताटीकोंडावार यांचा आंदोलनाचा इशारा

अहेरी-आलापल्ली रस्ता बांधकामाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा
- संतोष ताटीकोंडावार यांचा आंदोलनाचा इशारा


अहेरी ,
अहेरी-आलापल्ली या दयनीय झालेल्या रस्त्याची संबंधित कंत्राटदारामार्फत बांधकाम करण्यात आले. मात्र निकृष्ट बांधकामामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर बांधकामाची सखोल चौकशी करुन संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सार्वजनीक बांधकाम विभाग आलापल्ली कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अहेरी-आलापल्ली या मुख्य मार्गाची झालेली दयनीय अवस्था व कंत्राटदाराच्या निकृष्ट बांधकामाबाबत अनेकदा तक्रारी, निवेदन सादर करण्यात आले. मात्र अद्यापही सदर रस्त्याचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असून रस्त्याची स्थिती पुन्हा दयनीय झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी, महिला भगिनींना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या रस्त्यावर अनेकदा अपघात घडून आले असून नागरिकांनी कंबरदुखीचा त्रास सुरु झाला आहे. या मार्गावर अपघात होणे नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठानी लक्ष देऊन सदर कामाची चौकशी करुन दोषींवर फौजदारी तसेच दंडात्मक कार्यवाही करुन बांधकाम तत्काळ सुरु करावे, अन्यथा येत्या सात दिवसात सर्वसामान्य नागरिकांना घेऊन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतोष ताटीकोंडावार यांनी साबा विभागचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनातून दिला आहे.
ताटीकोंडावार यांच्या या रास्त मागणीला अहेरी, आलापल्ली येथील ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. सदर निवेदन कार्यकारी अभियंता रामटेके यांचे प्रतिनिधी जी. जी. गादेवार यांनी स्विकारले. याप्रसंगी अन्वर हुसेन, इबाना हुसेन, इरफान शेख, शब्बीर शेख, आसिफ शेख, गुलशन दुर्गे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments