अल्पवयीन मुलांना दूचाकी वाहन वापरण्यासाठी देणा­या 24 पालकांवर गडचिरोली पोलीसांकडून गुन्हे दाखल



अल्पवयीन मुलांना दूचाकी वाहन वापरण्यासाठी देणा­या 24 पालकांवर गडचिरोली पोलीसांकडून गुन्हे दाखल

 गडचिरोली शहरात 05 विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान करण्यात आली कारवाई


गडचिरोली,
गडचिरोली शहरातील वाढत्या वाहतूकीच्या वर्दळीमूळे गेल्या काही काळात शहरातील अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरात अल्पवयीन मुले देखील विनापरवाना दूचाकी चालवित असल्याचे दिसून येत आहे. याच पाश्र्वभूमीवर पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी शहरातील वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने होऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बेजबाबदार वाहन चालकांवर कडक कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या अनुषंगाने दिनांक 29/06/2025 रोजी अल्पवयीन मुलांना दूचाकी वाहन वापरण्यासाठी देणा­या 14 पालकांवर तसेच दिनांक 03/07/2025 रोजी 10 पालकांवर अशा एकूण 24 पालकांवर पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 29/06/2025 व 03/07/2025 रोजी गडचिरोली पोलीसांमार्फत शहरातील पाच विविध ठिकाणी नाकाबंदी मोहिम राबविण्यात येऊन वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणा­या वाहन चालकांवर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान काही अल्पवयीन मुले वाहन चालवितांना मिळून आले. या सर्वांकडे कुठल्याही प्रकारचा वाहन परवाना नसताना देखील त्यांच्या पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना दूचाकी वाहन वापरण्यासाठी दिल्याने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 कलम 199 (ए) अन्वये सदर 24 पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून वाहने जप्त करण्यात आली आहेत. मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 कलम 199 (ए) अन्वये अल्पवयीन व्यक्तीने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या पालकांना जबाबदार धरण्यात येते. सदर कलमानूसार अल्पवयीन बालकाकडून मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनूसार गुन्हा घडल्यास अशा वाहनाच्या मालकास 03 वर्षापर्यंत कारावास किंवा 25,000 रुपये दंड किंवा दोन्हीही अशा कडक शिक्षेची तरतूद आहे. तसेच अशा अल्पवयीन बालकावर बाल न्याय अधिनियम 2015 नूसार बाल न्याय मंडळासमोर खटला सुद्धा चालविला जाऊ शकतो. या मोहिमेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी सांगितले की, “सदर मोहिमेचा उद्देश शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे हा असून, पालकांनी देखील जबाबदारीने वागून आपल्या मुलांना रस्ते वाहतूकीविषयीच्या सर्व नियमांची माहिती करुन द्यावी.” तसेच पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी यापुढे ही मोहिम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.  

सदरची मोहिम पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. गोकुळ राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण, वाहतूक शाखेचे सपोनि. शरद मेश्राम व पोस्टे गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments