सांस्कृतिक स्पर्धांमधून महिलांचा व्यक्तिमत्त्व विकास
-माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन
सविता तांदळे बनल्या लोकमत सखी मंच होम मिनिस्टर स्पर्धेच्या विजेत्या
गडचिरोली :-
सर्वसाधारण महिला गृहिणी म्हणून आपल्या कामात नियमित व्यस्त असतात त्यांना आपल्यातील कलागुण दाखवणे व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळत नाही मात्र लोकमत सखी मंचाने महिलांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे व त्या संधीचे सोने करून महिलांनी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपल्यातील कलागुण विकसित करावे व आपले व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करावा. तसेच लोकमत सखी मंचाने नेहमीच अशा कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वसामान्य महिलांना प्रोत्साहन द्यावे व त्यांच्या कलागुणांचा विकास करावा असे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले. लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम दरम्यान महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
लोकमत सखी मंच गडचिरोलीच्या वतीने कॅम्प एरियातील हनुमान मंदिरासमोरील मैदानावर होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका रश्मीताई आखाडे सहसंयोजिका भाग्यश्री गड्डमवार, मृणाल उरकुडे, प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित महिलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यात विजयी स्पर्धक महिलांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या होम मिनीस्टर कार्यक्रमातून महिलांनी आपले कलागुण दाखवून स्पर्धेचा आनंद घेतला. व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन होम मिनिस्टर स्पर्धा गाजविली. यावेळी आयोजित सर्व स्पर्धामध्ये बाजी मारून कॅम्प एरियातील सौ सविता तांदळे यांनी होम मिनिस्टर होण्याचा मान मिळविला व होम मिनिस्टर चषक व पैठणी साडी पटकाविली त्यांना माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते पैठणी साडी व चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये कॅम्प एरिया मधील महिला व सखी मंच सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
0 Comments