शहरातील संपूर्ण अतिक्रमण हटवा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी
दुजाभाव केल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
गडचिरोली : नगर पालिकेने सुरू केलेली हटाव कारवाई आवश्यक असून शहरात वाढत असलेल्या अपघातांपासून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मात्र सुरू असलेली हटाव कारवाई बघता शहरातील हजारो कुटुंबांना आपल्या रोजीरोटीपासून वंचित केल्या जात असून काही लोकांना राजकीय दबाव आणि इतर बाबींमुळे अभय देण्याचे काम होत असल्याचा तसेच नियोजनशुन्य पध्दतीने, फुटपाथ धारकांबद्दल व्देष भावनेने हटाव कारवाई केली जात आहे, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला आहे.
त्यामुळे खालील मुद्यांची दखल घेवून सरसकटपणे हटाव कारवाई करावी, अन्यथा ज्या टप्प्यावर हटाव कारवाई सुरू आहे त्या टप्प्यावर तातडीने स्थगित करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील चारही मुख्य महामार्गावरील नालीवरची आणि नालीपलिकडील फुटपाथ धारकांची दुकाने हटविली जात आहेत. याबाबत अंतराचे काही प्रमाण ठरलेले आहे काय? असल्यास त्या मर्यादेत येत असलेल्या पक्क्या दुकानाचे अतिक्रमण आणि त्या दुकानदांरानी नालीवर आपले साहित्य विक्रीला ठेवणे कायदेशीर आहे काय? नसेल तर ते अतिक्रमणही याच हटाव कारवाई दरम्यान तातडीने हटविण्यात यावे. पक्क्या दुकानाच्या खालून महामार्ग ऑथोरिट ने नालीचे बांधकाम केले आहे ते कायदेशीर आहे काय ? नसल्यास सदर नालीवरील पक्के बांधकाम पाडण्यास इतर मुहूर्त न बघता याच हटाव कारवाई दरम्यान सदर बांधकामे तातडीने पाडण्यात यावेत. खासगी अतिक्रमण हटवीत असतांना शासकीय अतिक्रमणाला अभय देण्यात येवू नये, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
शहरातील चारही मुख्य रस्त्यावर खासगी बसेस, काळी - पिवळी, चारचाकी, ऑटो रिक्षा स्टँड कायदेशीर आहेत काय? नसल्यास ते हटवून त्या ठिकाणी वाहतुकीची होणारी कोंडी दूर करून अपघातांपासून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहेत काय? तसे असल्यास पर्यायी व्यवस्थेचे नियोजन पालिकेने सदर हटाव कारवाई दरम्यानच करावे. शहरातील चारही मुख्य रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये खरेदी करणारे ग्राहक आपली चारचाकी, दूचाकी वाहने रस्त्यावरच उभी करत असून या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून ही कोंडी दूर करण्यासाठी शहरातील चारही मुख्य रस्त्यालगत सार्वजनिक पार्किंग व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. त्याचे नियोजनही या हटाव कारवाई दरम्यान करण्यात यावे व नागरिकांना शहरात मुबलक प्रमाणात पार्किंग झोन उपलब्ध करून देण्यात यावेत. शहरातील रस्त्यांवर अपघात होवू नये यासाठी अतिक्रमण हटाव कारवाई करीत असतांनाच काही मोजक्या लोकांना भररस्त्यात हातगाडीवर फळं, भाजीपाला, नास्ता,रसवंती, भेळ - पाणीपूरी यांची दुकाने सुरू आहेत. त्यावर पालिकेने उपाय योजना याच दरम्यान करावी. शहरातील मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानदार मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आपले साहित्य विक्रीला ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. ते अतिक्रमणही याच हटाव कारवाई दरम्यान हटविण्यात यावे. व पक्के दुकानदार म्हणून दबावाखाली अभय देण्यात येवू नये.
शहरातील चारही मुख्य रस्त्यालगत कायदेशीररीत्या सर्विस रोड आवश्यक असतांनाही पालिकेने नागरिकांसाठी सर्विस रोड उपलब्ध करून दिलेले नसणे ही बाब शहरातील अपघातांना कारणीभूत आहे. त्यासाठी या कारवाई दरम्यान शहरात सर्विस रोड करीता पक्के अतिक्रमण सुध्दा हटवावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी वैध स्पीड ब्रेकर सह स्वयंचलित वाहतूक सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी. ही बाब पालिकेच्या कक्षेत नसल्यास संबंधित विभागांना तसे तातडीने निर्देश देण्यात यावेत. मागील ४० वर्षांपासून शहरात असलेल्या फुटपाथधारकांना कोणतीही पर्यायी व्यवस्था उभी न करता सदर हटाव कारवाई केली जात असून, फुटपाथवर दुकान लावण्यासाठी शासनाचे विभाग आणि बॅंकांनी दिलेले कर्ज हफ्ते भरणे या हटाव कारवाईमुळे फुटपाथ धारकांना अशक्य असल्याने सदर कर्ज शासनाने आणि बॅंकांनी माफ करण्यासाठी पालिकेने पाठपुरावा करावा किंवा या कारवाईचा धसका घेऊन एखाद्या फुटपाथ धारकाने आत्महत्या केल्यास त्याची जबाबदारी पालिका प्रशासनाने घ्यावी, अशीही मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
हटाव कारवाई ही कायदेशीररीत्या तसेच सरसकटपणे राबविण्यात यावी. केवळ अपघातांचे कारण देवून द्वेषभावनेतून फक्त फुटपाथ धारकांची दुकाने हटविली जावून मोठ्या दुकानदारांना अभय देण्याचे काम पालिकेने करु नये. तसे झाल्यास शेतकरी कामगार पक्षातर्फे कायदेशीरपणे पालिकेविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर यांनी नगर पालिका प्रशासनाला दिला आहे.
0 Comments