गडचिरोली पोलीस दलात जिल्ह्रासाठी अत्याधुनिक वाहन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’
गडचिरोली,
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक/न्याय वैद्यकीय पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग म्हणून राज्य शासनाच्या धोरणानूसार महासंचालक (न्याय व तांत्रिक) यांच्या वतीने ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ची उपलब्धता गडचिरोली जिल्ह्रासाठी करण्यात आली आहे. या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्ह्यांचा छडा लावणे सोपे होणार असून न्याय वैद्यकीय सहाय्य पुरविण्यासाठी हे अत्याधुनिक वाहन उपयुक्त ठरणार आहे.
जिल्ह्यातील गुन्हे तपास यंत्रणेला तांत्रिक बळकटी देण्यासाठी तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विविध गुन्ह्यांवर अंकुश लावण्यासाठी मंगळवार (ता. ७) पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे’ अनावरण पोलिस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले. तसेच नजीकच्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अत्याधुनिक व्हॅनमुळे गुन्हे तपासणी अधिक जलद, अचूक आणि प्रभावी होणार आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक फॉरेन्सिक उपकरणे बसविण्यात आली असून गुन्ह्याच्या ठिकाणीच प्राथमिक पुरावे संकलित करणे, विश्लेषण करणे आणि त्वरित अहवाल तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेत वेळेची बचत होऊन वैज्ञानिक तपासात अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता येणार आहे. तसेच ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फॉरेन्सिक किट्स, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन अॅप्लिकेशन यांचा समावेश आहे. यामध्ये डिजीटल फॉरेन्सिक, डीएनए सॅम्पलिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि क्राईम सीन मॅपिंग यासारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. विशेषतः सायबर गुन्हे, हत्या, अपघात आणि अन्य गंभीर गुन्ह्यांच्या तपासात ही व्हॅन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या अनावरणप्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, फॉरेन्सिक विज्ञानाचा वापर करून तपास यंत्रणा अधिक मजबूत आणि पारदर्शक बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून तपास कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. तसेच गुन्ह्यांचा उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे. याप्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, महिला पोलिस उपनिरीक्षक नेहा हांडे तसेच इतर अधिकारी व अंमलदार आदी उपस्थित होते. जेव्हा गुन्हा नोंदविला जातो, तेव्हा नियंत्रण कक्ष फॉरेन्सिक पथकाला सुचित करेल. फॉरेन्सिक पथक गुन्हे स्थळाला भेट देऊन ते गुन्ह्याची माहिती नोंदवून क्राईम सीन अॅप्लिकेशनमध्ये अद्ययावत करतील. फॉरेन्सिक तज्ज्ञ गुन्ह्याच्या ठिकाणी छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करतील. त्यानंतर क्राईम सीन रिपोर्ट तयार करून पोलिस तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जाईल.
0 Comments