अहेरी उपविभागात युरियाचा तीव्र तुटवडा; ऑल इंडिया किसान सभेचा इशारा – मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन
अहेरी (प्रतिनिधी) :
अहेरी उपविभागातील एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी व मुलचेरा या पाचही तालुक्यांमध्ये खरीप हंगामाच्या मध्यावर शेतकऱ्यांना युरियाच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेतकरी दररोज कृषी केंद्रांसमोर मोठ्या रांगा लावूनही त्यांना खत मिळत नाही. या कमतरतेमुळे काळाबाजाराला ऊत आला असून शेतकऱ्यांची सरळसरळ लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
युरियाच्या तुटवड्यामुळे पिकांची वाढ खुंटत असून खरीप उत्पादनावर गंभीर संकट ओढवले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया किसान सभा, गडचिरोली जिल्हा यांच्यावतीने उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मागण्या :
1. उपविभागातील सर्व तालुक्यांमध्ये त्वरित व पुरेशा प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून द्यावे.
2. काळाबाजार करणारे दुकानदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी.
3. शासनाने ठरवून दिलेल्या दरातच शेतकऱ्यांना खत मिळेल, याची हमी द्यावी.
किसान सभेचे नेते कॉ. सचिन मोतकुरवार (अहेरी विधानसभा अध्यक्ष), कॉ. सुरज जककुलवार (जिल्हा सदस्य) व कॉ. रमेश कवडो (तालुका अध्यक्ष)** यांनी इशारा दिला आहे की, जर या मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर उपविभागीय कृषी कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.
---
0 Comments