धान उचल न झाल्यास “धान फेको आंदोलन” उभारणार — ऑल इंडिया किसान सभेचा इशारा

धान उचल न झाल्यास “धान फेको आंदोलन” उभारणार — ऑल इंडिया किसान सभेचा इशारा
अहेरी :
शेतकऱ्यांनी घामाचे शिंतोडे उडवून, उन्हातान्हात मेहनत करून उत्पादित केलेले धान आज शासनाच्या निष्काळजीपणामुळे उघड्यावर पडून सडत आहे. अहेरी विभागातील सर्व पाचही तालुक्यांतील (एटापल्ली,भामरागड,मूलचेरा,अहेरी,सिरोंचा)खरेदी केंद्रांवर मागील अनेक महिन्यांपासून लाखो क्विंटल धान पडून आहे. सततच्या पावसामुळे या धानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ते खाण्यायोग्य राहिलेले नाही.
धानाची अशी अमानुष नासाडी होणे हे केवळ शेतकऱ्यांशी अन्याय नसून कोट्यवधी रुपयांचा अपव्यय करून जनतेच्या ताटातील अन्न हिरावून घेण्याचा प्रकार आहे. गावोगावी उपासमारीची स्थिती आहे, कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळत नाही, आणि दुसरीकडे शासन मात्र जनतेच्या तोंडचे धान सडू देत आहे. हा कारभार शासनवर्गाच्या जनविरोधी वृत्तीचा जिवंत पुरावा असल्याचे मत ऑल इंडिया किसान सभेने नोंदवले आहे.
या गंभीर प्रश्नावर ऑल इंडिया किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा कौन्सिलतर्फे उप प्रादेशिक व्यवस्थापक, आ.वि. महामंडळ कार्यालय, अहेरी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात किसान सभेने शासनाच्या दुर्लक्षावर जोरदार प्रहार करत स्पष्ट इशारा दिला आहे.
किसान सभेच्या मागण्या अशा आहेत :
१) सडत असलेले सर्व धान १५ दिवसांच्या आत तातडीने उचलावे.
२) जर धानाची उचल शक्य नसेल, तर ते स्थानिक जनतेला मोफत वाटप करावे.
या मागण्या शासनाने मान्य न केल्यास जनता आता शांत बसणार नाही. किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि जनता रस्त्यावर उतरून “धान फेको आंदोलन” उभारतील. या आंदोलनांतर्गत सडलेले व कुजलेले धान ट्रक, ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांतून भरून थेट महामंडळ कार्यालयासमोर फेकण्यात येईल. त्यातून उद्भवणाऱ्या गोंधळास पूर्णपणे शासन व महामंडळ जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
खनिज संपत्ती लुटण्यासाठी, मोठ्या उद्योगपतींसाठी शासनाकडून तातडीने रस्ते, पायाभूत सुविधा आणि संरक्षण व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. मात्र गरीब शेतकऱ्यांचे धान महिनोन्‌महिने उघड्यावर पडले तरी शासनाला ते उचलण्याचीही फुरसत नाही. हा दुहेरी कारभारच आजच्या जनतेच्या दारिद्र्याला, उपासमारीला आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत आहे.
या प्रश्नावर किसान सभेचे कॉ. सचिन मोतकुरवार (अध्यक्ष – अहेरी विधानसभा), कॉ. सूरज जककुलवार (जिल्हा सदस्य), कॉ. रमेश कवडो (तालुका अध्यक्ष) व कॉ. सत्तू हेडो (ता. उपाध्यक्ष) यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यांनी म्हटले की, *“शेतकऱ्यांच्या घामाचे अन्नधान्य सडवून शासन जनता व शेतकऱ्यांचा घोर अपमान करत आहे. जनता आता हातावर हात धरून बसणार नाही. धान उचलले गेले नाही तर महामंडळ कार्यालय मध्ये धान फेकून भ्रष्ट महामंडळ चा मुखवटा फाडून टाकला जाईल.
ऑल इंडिया किसान सभेच्या हाकेला प्रतिसाद देऊन तालुक्यातील शेकडो शेतकरी, मजूर, महिला व विद्यार्थी सज्ज होत आहेत. धान वाचवण्यासाठी आणि हक्काचे अन्न परत मिळवण्यासाठी ही लढाई आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे.
धान सडू देणार नाही – जनता उपाशी राहणार नाही!
या घोषणा आता गावागावात घुमत असून, प्रशासनाला जनतेच्या या आंदोलनासमोर झुकावे लागेल, असा जनतेत विश्वास निर्माण झाला आहे.


Post a Comment

0 Comments