स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन मिळणार तरी कधी? धर्मरावबाबांना साकडे रायुकाँची मागणी

स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन मिळणार तरी कधी? धर्मरावबाबांना साकडे रायुकाँची मागणी



गडचिरोली : तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची कोरोना काळातील कमिशनची रक्कम प्रलंबित आहे. शिवाय विविध मागण्या प्रलंबित आहेत. या सर्व समस्या मार्गी लावून दुकानदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रुपेश आर. वलके यांनी केली आहे.
याबाबत वलके यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना शनिवारला गडचिरोली येथे निवेदन दिले. गडचिरोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची माहे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात नगदी स्वरुपात भरलेली रक्कम येत्या महिनाभरात बँक खात्यात जमा करण्यात यावी. गडचिरोली जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांचे माहे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचे ७० रुपये याप्रमाणे प्रलंबित असलेले कमिशन जमा करण्यात यावे. माहे मार्च ते जुलै २०२३ महिन्यापर्यंत मोफतमध्ये वाटप करण्यात आलेल्या धान्याचे प्रलंबित असलेले कमिशन रास्त भाव दुकानदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे. मोफतमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या धान्याचे कमिशन महिना टु महिन्यातच जमा करण्यात यावे. माहे २०२२-२३ या वर्षामध्ये आलेल्या
रेशनकार्डधारकांसाठी धान्य उपलब्ध करावे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या पोर्टेबिलिटीअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना नियमित देण्यात येणारे धान्य वगळता पोर्टेबिलिटीचे धान्य देण्यात यावे. थेट वाहतुकीचे धान्य स्वस्त धान्य दुकानात पाठविताना ते धान्य दुकानदारांना काटा करून मोजून द्यावे. गडचिरोली जिल्ह्यातील तालुकास्तरावर व गडचिरोली शहरामध्ये सुरू करण्यात आलेली शासनाची थेट वाहतूक ही स्वस्त धान्य दुकानदारांना परवडण्यासारखी नसल्यामुळे ती तत्काळ बंद करावी. गडचिरोली जिल्ह्यातील रास्त भाव दुकानामध्ये देण्यात आलेल्या पॉस मशिनमध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे नवीन पॉस मशिन देण्यात यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

Post a Comment

0 Comments