वडसा रेल्वे स्थानकही होणार स्मार्ट, पुनर्विकासाच्या कामाचा शुभारंभ
पंतप्रधानांचे व्हिडिओ कॅान्फरन्सिंगने मार्गदर्शन
गडचिरोली :जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक असलेल्या वडसा स्थानकाचा समावेश अमृत भारत स्टेशन योजनेत करण्यात आल्यानंतर रविवारी (दि.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी व्हिडीओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे यांच्यासह दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे उपप्रादेशिक व्यवस्थापक अशोक सूर्यवंशी आणि भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.वडसा रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या स्क्रिनवर पंतप्रधान मोदी यांचे भाषण एेकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी रेल्वेचे डीआरएफ सूर्यवंशी यांनी पुनर्विकास योजनेतून या रेल्वे स्थानकावर कोणकोणत्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत याची माहिती प्रास्ताविकातून दिली. खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्ह्यात आणि गडचिरोली-चिमूर मतदार संघात आमगाव, नागभिड स्थानकांदरम्यान रेल्वेचे जाळे विकसित करण्यासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. वडसा स्थानकावरील कामांसाठी १८.४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आ.कृष्णा गजबे यांनीही वडसा स्थानकाच्या पुनर्विकासामुळे नागरिकांना कोणता लाभ होईल याची माहिती दिली.
या कार्यक्रमाला पद्मश्री परशुराम खुणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री तथा लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, संघटन महामंत्री संजय गजपुरे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, युवा मोर्चाचे चांगदेव फाये, अल्पसंख्याक आघाडीचे बबलू हुसैनी, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, ओबीसी प्रदेश सरचिटणीस संगीता रेवतकर, युवती प्रमुख प्रिती शंभरकर, अनिल पोहनकर, अनिल कुनघाडकर, केशव निंबोड आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments