जांबियात ग्रामपंचायत बंद – ग्रामस्थांना न्याय कुठे मिळणार?
एटापल्ली (प्रतिनिधी) :
जांबिया ग्रामपंचायत हद्दीत स्थानिक नागरिकांना शासकीय सेवा मिळवण्यासाठी वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामसेवक व इतर ग्रामपंचायत कर्मचारी नियमितपणे कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांची कामे अनेक दिवस प्रलंबित राहतात. या कारभाराबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, ग्रामसेवकाने मुख्यालयी राहून सर्व कार्यदिवशी कार्यालय सुरु ठेवावे, अशी ठाम मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व संलग्न जनसंघटनांनी केली आहे.नागरिकांच्या अडचणी
ग्रामपंचायतीमार्फत जन्म-मृत्यू दाखले, रेशन संबंधित प्रमाणपत्रे, निवडणूक नोंदणी, विविध शासकीय योजनांचे अर्ज, मनरेगा मजुरांचे हजेरीपत्रक आदी इतर अनेक आवश्यक कामे केली जातात. मात्र, अनेकदा कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित असल्याने गावकरी कामासाठी येऊन परत जातात. काही प्रकरणांमध्ये नागरिकांना पुन्हा पुन्हा चकरा माराव्या लागतात. परिणामी तातडीच्या सेवांसाठीही दिरंगाई होते.
ग्रामस्थांचे थेट उद्गार
गावातील रहिवासी रामदास उसेंडी म्हणाले, ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यावर अनेकदा कुलूपच लावलेले असते. आम्हाला एखादे प्रमाणपत्र हवे असल्यास आठवड्याला दोन-तीन वेळा जावे लागते. वेळेवर सेवा मिळत नसल्यामुळे आम्ही वैतागलो आहोत.
तर हरिदास गावडे यांनी सांगितले, घरकुल आणि पाणी समस्या आमची आजपर्यंत कायम आहे ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नाही
ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले की, शासकीय योजना व सेवा या गावकऱ्यांचा हक्क आहे. कर्मचारी नियमित हजेरीत नसतील तर प्रशासनाने जबाबदारी ठरवली पाहिजे.
मागणीपत्र गटविकास अधिकाऱ्यांकडे
या अडचणी लक्षात घेऊन भाकपा गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी, पंचायत समिती एटापल्ली यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, ग्रामसेवक मुख्यालयी राहून आठवड्यातील सर्व कार्यदिवशी कार्यालय सुरु ठेवावे. तसेच सर्व उपलब्ध ग्रामपंचायत कर्मचारी नियमितपणे हजेरी लावून गावकऱ्यांच्या सेवेत राहावेत.
उपस्थिती व नेतृत्व
या निवेदनाला भाकपा व संलग्न संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला. कॉ. सुरज जककुलवार (AISF जिल्हा संयोजक), कॉ. रामदास उसेंडी (AIKS संपर्क प्रमुख), कॉ. राकेश होळी (AIKS सदस्य), कॉ. हरिदास गावडे (AIKS सदस्य), कॉ. यशवंत कोवासी (AIKS सदस्य) आणि कॉ. सुधाकर हेडो (AIKS सदस्य) यांची उपस्थिती होती.
तात्काळ कार्यवाहीची अपेक्षा
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ग्रामपंचायत कार्यालय हे गावकऱ्यांसाठी प्राथमिक प्रशासनिक केंद्र आहे. येथे कर्मचारी अनुपस्थित राहिल्यास थेट लोकांच्या रोजच्या जीवनावर परिणाम होतो. शासकीय सेवा वेळेत न मिळाल्यास अनेक नागरिकांच्या योजना, रोजगार व प्रमाणपत्रे प्रलंबित राहतात. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
---
0 Comments