गटटा ते कोठी रस्ता व पूल बनणार – भाकपा
दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मंजुरी; लवकरच कामाला सुरुवात
एटापल्ली,
एटापल्ली तालुक्यातील गटटा गाव ते भामरागड तालुक्यातील कोठी गाव या दरम्यानचा नवीन डांबरी रस्ता व पूल बांधकाम करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग एटापल्ली यांनी लेखी पत्राद्वारे कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव भाकपा तथा राज्य उपाध्यक्ष AIYF, यांना माहिती दिली आहे. निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच कार्यारंभ पत्र देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
गटटा व कोठी या गावांमध्ये रोटी-बेटीचे नाते असल्याने या मार्गाने दोन्ही तालुक्यातील नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. बाजार, व्यापार, शिक्षण तसेच शासकीय कामकाजासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र या मार्गावर योग्य डांबरी रस्ता व पूल नसल्याने नागरिकांना दीर्घकाळापासून प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात या मार्गाने प्रवास करणे अतिशय कठीण होत असे.
या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा** करण्यात येत होता. विविध स्तरांवर निवेदने देऊन व आंदोलने करून हा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात आला. शेवटी प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन रस्ता व पूल बांधकामास मंजुरी दिली आहे.
रस्ता व पुलाच्या कामामुळे गटटा-कोठी या परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच दोन्ही तालुक्यांमधील व्यापारी देवाण-घेवाण, बाजारपेठेतील हालचाल व सामाजिक-सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत होतील.
याबाबत बोलताना कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, हा विजय जनतेच्या संघर्षाचा आहे. लोकांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळेच गटटा-कोठी मार्गाचे काम मंजूर झाले आहे. आता प्रत्यक्ष काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने व्हावे, हीच अपेक्षा आहे.
या निर्णयामुळे गटटा-कोठी भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. नागरिकांनी हा निर्णय स्वागतार्ह ठरवत भाकपाचे आभार मानले असून लवकरच या मार्गाचा विकास होऊन परिसरातील जीवनमान उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 Comments