पोलिस दलातील वासुदेव मडावी यांनी 101 माओवाद्यांना ठार करण्याचा केला विक्रम

पोलिस दलातील वासुदेव मडावी यांनी 101 माओवाद्यांना ठार करण्याचा केला विक्रम
गडचिरोली, ता. २८ : गडचिरोली जिल्ह्यातील सी - ६० पार्टी कमांडर वासुदेव मडावी यांनी बुधवार (ता. २७) कोपर्शीच्या चकमकीत माओवाद्यांना ठार करून आपल्या २६ वर्षांहून अधिक काळातील पोलिस सेवेत १०१ माओवादी ठार करण्याचा विक्रम नोंदवला आहे.

पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत वासुदे मडावी यांनी आजपर्यंत एकूण ५८ चकमकींमध्ये सहभागी होऊन एकूण १०१ माओवाद्यांना यमसदनी धाडले आहे. त्यांचे पूर्ण नाव वासुदेव राजम मडावी असून जन्म १० नोव्हेंबर १९७६ रोजी झाला. सध्या ते पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ४ एप्रिल १९९८ मध्ये गडचिरोली पोलिस दलात नियुक्त झालेले वासुदेव मडावी यांनी अभूतपूर्व शौर्य दाखवत ५८ चकमकींमध्ये एकूण १०१ माओवाद्यांना कंठस्नान घातले, तर ५ माओवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना पोलिस शौर्य पदक, असाधारण आसूचना कुशलता पदक आणि पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वासुदेव मडावी यांनी माओवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या विशेष अभियान पथकामध्ये 26 वर्षांहून अधिक काळ कर्तव्य बजावले आहे. पोलीस शिपाई ते पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात 3 वेगवर्धीत पदोन्नती मिळाल्या आहेत. त्यां;s अभियानातील कौशल्य आणि निर्भय दृष्टिकोनामुळे त्यांना सी-६० पथकामध्ये एक मह। त्त्ववपूर्ण पार्टी कमांडर बनवले आहे, ज्याचे नेतृत्व ते ४८ व्या वर्षीही करत आहेत. सर्वात धोकादायक परिस्थितीतही नेतृत्व करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना त्यांच्या सहकारी अधिकारी व अंमलदार तसेच
वरिष्ठांकडून देखील आदर आणि प्रशंसा मिळाली आहे. त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्य पदक देखील मिळाले आहे. याव्यतिरिक्त, त्यांचे आणखी दोन पोलिस शौर्य पदकासाठीचे प्रस्ताव सध्या विचाराधीन आहेत.
यासोबतच त्यांना महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांचेकडून मिळणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देखील प्राप्त झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक वासुदेव मडावी यांनी कोपर्शी चकमकीत ४ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालून एकूण १०१ माओवाद्यांना कंठस्नान घालण्याची कामगिरी बजावलेली आहे. त्यांच्या या कमगिरीबद्दल पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिस उपनिरीक्षक वासुदेव मडावी यांचा गौरव करण्यात आला. वासुदेव मडावी यांनी बोरीया कसनासूर - एकूण ४०, गोविंदगाव चकमकीत एकूण ६, मर्दिनटोला चकमकीत एकूण २७, कोपर्शी-कोढूर चकमकीत एकूण ५, कतरंगट्टा चकमकीत-एकूण ३ आणि कोपर्शी चकमकीत एकूण ४ अशा एकून १०१ माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे.



Post a Comment

0 Comments