आलापल्ली ग्रामपंचायतीतील स्वच्छ भारत मिशनच्या कामाची चौकशीची मागणी

आलापल्ली ग्रामपंचायतीतील स्वच्छ भारत मिशनच्या कामाची चौकशीची मागणी


आलापल्ली : 
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आलापल्ली ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बांधकामाच्या कामाबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत.फुकट नगर येथील नागरिकांनी या बांधकामामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला आहे. चुकीच्या ठिकाणी केलेल्या या बांधकामामुळे स्थानिकांना नाहक त्रास होत असून, याची चौकशी करून सदर बांधकाम हटवण्याची आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या या बांधकामामुळे पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे,ज्यामुळे फुकट नगर परिसरात पाणी साचण्याची समस्या उद्भवली आहे. यामुळे रहिवाशांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अजय कंकडालवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कंकडालवार यांनी यासंदर्भात सांगितले, "स्वच्छ भारत मिशन ही एक महत्त्वाची योजना आहे, परंतु चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना त्रास होत असेल तर त्याची तातडीने चौकशी होणे आवश्यक आहे. फुकट नगरातील बांधकाम योग्य ठिकाणी नसल्याने स्थानिकांना अडचणी येत आहेत.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाकडे या समस्येचे त्वरित निराकरण करण्याची मागणी केली आहे. स्वच्छ भारत मिशनच्या उद्देशाला अनुसरून कामे होणे अपेक्षित आहे, परंतु चुकीच्या नियोजनामुळे उद्भवलेल्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. आता प्रशासन या मागणीवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments