एटापल्ली तालुक्यात बोगस डॉक्टरांवर प्रशासनाचा धडक कारवाईचा बडगा; चार जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

एटापल्ली तालुक्यात बोगस डॉक्टरांवर प्रशासनाचा धडक कारवाईचा बडगा; चार जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश


शशांक नामेवार तालुका प्रतिनिधी, एटापल्ली

एटापल्ली,
 तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा भांडाफोड अखेर गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५ रोजी झाला. पंचायत समिती एटापल्लीच्या सभागृहात, दुपारी २ वाजता, गट विकास अधिकारी व बोगस डॉक्टर तपासणी समितीचे अध्यक्ष डॉ. आदिनाथ आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण सभा घेण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी व समिती सचिव डॉ. भुषण चौधरी, विस्तार अधिकारी (आरोग्य) श्री. देवेंद्र नगराळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. मडावी, डॉ. राजू स्वामी, तालुका किटकशास्त्रज्ञ श्री. श्रावण राठोड, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक कु. आरती कोरेत आणि श्री. अनल उपस्थित होते.

या बैठकीसाठी तालुक्यातील २२ संशयित डॉक्टरांना बोलाविण्यात आले होते, मात्र त्यापैकी केवळ ११ जण हजर राहिले. त्यांच्या सादर केलेल्या शैक्षणिक आणि वैद्यकीय कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान केवळ एका व्यक्तीकडे बीईएमएसची अधिकृत पदवी असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला संबंधित पॅथीमध्येच वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले गेले.

मात्र, उर्वरित डॉक्टरांमध्ये अनेकांकडे केवळ डिप्लोमा, अपूर्ण शिक्षण किंवा खोटी कागदपत्रे असल्याचे उघड झाले. यामध्ये श्री. दिपंकर दीपक सरदार (D. Pharm), श्री. आशुतोष चितल मंडल (D. Pharm), श्री. राकेश गौर मंडल (DMHS), श्री. संजय मंटू करमरकर (BAMS (AM)) आणि श्री. दुलाल सिकदार (RMP) या व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांकडे वैध नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, दुलाल सिकदार यांनी दुस्सागुड्डा येथे मलेरियाग्रस्त रुग्णावर औषधोपचार केल्यामुळे निदानास विलंब झाला. दुसरीकडे, राकेश मंडल यांनी कागदपत्र पडताळणी दरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला, जे शासकीय कामात अडथळा समजून त्यांच्यावर कठोर कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याचप्रमाणे, जवेली येथे गरोदर महिलेला दिले गेलेले औषध बोगस डॉक्टरांच्या हातून दिले गेले होते, तर जारावंडी येथे श्रीमती सुनिता मंडल यांना औषधोपचार करताना रंगेहाथ पकडण्यात आले.

या गंभीर प्रकारांमुळे सदर चौघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश समिती अध्यक्षांनी दिले आहेत. सर्व बोगस डॉक्टरांकडून भविष्यात वैद्यकीय व्यवसाय न करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले गेले. तसेच, त्यांच्याकडे आढळलेला औषधसाठा तातडीने आरोग्य कार्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सभेस अनुपस्थित राहिलेल्या इतर बोगस डॉक्टरांना २५ जुलै २०२५ रोजी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ही कारवाई केवळ सुरुवात असून, तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी अशा अवैध डॉक्टरांवर सातत्याने कारवाई होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी अशा बोगस डॉक्टरांच्या जाळ्यात न अडकता अधिकृत वैद्यकीय सेवा घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 चार बोगस डॉक्टरांविरोधात फौजदारी,इतरांचीही धाकधूक वाढली

आरोग्य विभागाने एटापल्ली तालुक्यातील चार बोगस डॉक्टरांविरोधात तातडीने कारवाई करत संबंधित पोलीस विभागात फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. या चार डॉक्टरांमध्ये गरोदर मातेला चुकीचे औषध देणे, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून शासकीय कामात अडथळा आणणे, आणि बेकायदेशीर औषधोपचार करणे यासारख्या गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा पोलीस विभागाच्या पुढील पावलाकडे लागल्या आहेत—ते या डॉक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या कारवाईमुळे तालुक्यातील इतर बोगस डॉक्टरांचेही धाबे दणाणले असून, अनेकांनी स्वतःहून वैद्यकीय व्यवसाय थांबवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

 *बोगस डॉक्टरांविरोधातील लढ्यात डॉ. भूषण चौधरी यांची ठाम आणि प्रेरणादायी भूमिका* 

तालुक्यात बोगस डॉक्टरांविरोधात झालेल्या कठोर कारवाईमागे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांनी निष्ठेने आणि जबाबदारीने या गंभीर विषयाकडे लक्ष दिले. गावोगावी फिरून माहिती संकलित करणे, बोगस डॉक्टरांची यादी तयार करणे, शंका असलेल्या वैद्यकीय व्यवसायिकांची कागदपत्रे तपासणे आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत समन्वय साधून सभेचे आयोजन करणे हे सगळे कार्य डॉ. चौधरी यांनी अत्यंत सचोटीने पार पाडले. गरोदर मातेला दिले गेलेले चुकीचे औषध असो वा मलेरियाच्या निदानात झालेली विलंब – प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा करत त्यांनी आरोग्य व्यवस्थेतील अनियमिततेवर रोख घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दृढ निश्चयामुळे आणि तत्परतेमुळेच ही कारवाई यशस्वीपणे पार पडली असून बोगस डॉक्टरांचे धाडस मोडले गेले आहे. डॉ. चौधरी यांचे कार्य तालुक्याच्या आरोग्यविषयक सुरक्षेसाठी एक आदर्श ठरत आहे.


 दुर्गम भागांतील गरजूंना योग्य उपचार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो, पण दुर्दैवाने आमच्या आधीच बोगस डॉक्टर रुग्णांपर्यंत पोहोचून चुकीचे निदान व उपचार करतात. त्यामुळे गर्भवती माता, मलेरियाग्रस्त रुग्ण किंवा इतर गंभीर आजार असलेल्या लोकांचे अनावश्यक बळी जातात. ही मानवतेची शोकांतिका आहे. म्हणूनच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आम्ही ठोस पावले उचलत आहोत आणि बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.

 डॉ. भूषण चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, एटापल्ली

Post a Comment

0 Comments