दिवंगत नेते माजी आमदार स्व. नामदेवराव सावकार पोरेड्डीवार यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने 'परंपरा लोकहिताची' स्मरणिकेचे प्रकाशन
गडचिरोली,
गडचिरोली: चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित करणारे, माजी आमदार स्व. नामदेवराव बालाजी पोरेड्डीवार यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आज 'परंपरा लोकहिताची' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीतही समाजासाठी प्रकाशाची फुले फुलवणाऱ्या पोरेड्डीवार यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, मुख्य कार्यालय, गडचिरोली येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
२५ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता श्रावण महिन्याच्या शुभारंभात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहकार महर्षी मा. श्री अरविंद नामदेवराव पोरेड्डीवार यांनी भूषवले. स्मरणिकेचे प्रकाशन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉ. श्री प्रशांत बोकारे यांच्या शुभ हस्ते झाले.
यावेळी जिल्हा बँकेतर्फे सन २०२४-२५ चा 'जिल्हा गौरव पुरस्कार' श्री दादाजी सीताराम चुधरी, गडचिरोली यांना देऊन गौरवान्वित करण्यात आले. तसेच, वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना धनादेश वाटप कार्यक्रमही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्याला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. डॉ. मिलींद नरोटे, गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. श्रीराम श्रावण कावळे, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. श्री प्रकाश सा. पोरेड्डीवार, माजी आमदार मा. श्री कृष्णाजी गजबे, माजी आमदार मा. डॉ. देवराव होळी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष मा. श्री रमेश बारसागडे, भाजप माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, कर्नल विक्रम मेहता, भाग्यवान खोब्रागडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, सचिव अनंत साळवे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान, सहकार महर्षी तथा गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. श्री प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार यांचा वाढदिवस असल्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी शाल/श्रीफळ देऊन त्यांचे सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवंगत नेते माजी आमदार स्व. नामदेवराव बालाजी पोरेड्डीवार यांनी स्वीकारलेले जनसेवेचे व्रत अविरत पुढे चालत राहावे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
0 Comments