ग्रामसेवक गेला कुण्या गावा ; तलाठ्यांचा नाही कसा ठावा !
मुख्यालयी नसलेल्या कर्मचाऱ्यांमुळे एटापल्ली तालुक्यात नागरीकांची गैरसोय ,गडचिरोली शहरात वास्तव करीत गुलमोहर कॉलनी,बस स्थानका मागे , साई नगर ,गोकुळ नगर इत्यादी ठिकाणी राहतात
एटापल्ली
एटापल्ली तालुक्यात ग्रामसेवक आणि तलाठी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहावे असा शासनाचा स्पष्ट आदेश असूनही बहुतांश कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे शासकीय कामकाज खोळंबत आहे. नागरिकांना छोटे छोटे दाखले काढण्यासाठीसुद्धा मुख्यालयाचा शोध घ्यावा लागत आहे.
तालुक्यात सध्या 31 ग्रामसेवक कार्यरत आहेत, तसेच 57 तलाठी पदांपैकी 21 पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे 9 मंडळ अधिकारी पदांपैकी 1 पद रिक्त असून कार्यरत तलाठ्यांवर अतिरिक्त राज्यांचा भार आहे. ग्रामसेवक आणि तलाठ्यांना सरकारने मुख्यालयी राहण्यासाठी ठिकाणे आणि साधन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, मात्र ते मुख्यालयी वास्तव्यास राहात नाहीत.
मुख्यालयात न राहणाऱ्या तलाठी आणि ग्रामसेवकांमुळे शेतकरी, विद्यार्थी, वृद्ध आणि गरजू लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय कामांसाठी – जसं की पीक कर्जासाठी ७/१२, घरकुलाचा अर्ज, जाती-निवासी, उत्पन्न, वयाचे दाखले – हे मिळवण्यासाठी लोकांना वारंवार चकरा माराव्या लागतात. अनेकदा हे कर्मचारी गावात नसतात,त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणतात"थांबा मी येत आहे " असं सांगतात, पण तासंतास वाट पाहूनही येत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा लोकांचं काम होत नाही आणि त्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागतं. यामुळे वेळ, पैसा आणि मेहनत वाया जात आहे.
ग्रामसेवक व तलाठ्यांचे मुख्यालयी नसणे ही सामान्य नागरिकांच्या अडचणींना कारणीभूत ठरत आहे. नागरिकांचे महत्त्वाचे कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत, याचा थेट परिणाम शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यावर होत आहे. यामुळे अनेक गरीब व गरजू लोकांची अडवणूक होते.
तालुक्यातील नागरिकांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता तालुक्यातून मागणी होत आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी सक्ती करावी आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
तालुक्याला रूम घेऊन ऑफिस थाटले; कागदपत्रे प्रवाशामार्फत पाठवण्याची नवी पद्धत!
तलाठी आणि ग्रामसेवकांपैकी काही जणांनी थेट तालुका ठिकाणी खासगी रूम घेऊन तेथेच आपली ऑफिसे सुरू केली आहेत. गावात प्रत्यक्ष जाऊन काम करण्याऐवजी ते तालुक्याहूनच संपूर्ण कारभार चालवत आहेत. एखाद्याला अर्जेंट कागदपत्र हवे असल्यास, ते स्वतः न देता त्या गावात जाणाऱ्या प्रवाशामार्फत पाठवले जातात. ही पद्धत पूर्णपणे चुकीची असून शासनाच्या नियमांना विरोधात आहे. नागरिकांच्या गरजा, वेळ आणि अधिकार यांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे या गैरप्रकारावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.
जंगलव्याप्त तालुक्यात दळणवळणाची गैरसोय; शासकीय कामांसाठी नागरिकांना आर्थिक फटका
सदर एटापल्ली तालुका पूर्णपणे जंगलव्याप्त आणि दुर्गम भागात आहे. येथे दळणवळणाच्या सुविधा अत्यंत कमी असून, गावातून तालुका ठिकाणी जाणे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी अडचण बनली आहे. अशा परिस्थितीत ग्रामसेवक आणि तलाठी मुख्यालयी अनुपस्थित राहत असल्याने नागरिकांना आपल्या शासकीय कामांसाठी अनेक वेळा तालुक्याची वाट धरावी लागते. यामध्ये त्यांचा वेळ, मेहनत आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात होतो आहे. अनेक गरीब व गरजू लोकांना या कारणाने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी तालुक्यातील नागरिकांची जोरदार मागणी आहे.
मुख्यालयी न राहणारे तलाठी व ग्रामसेवक हे शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करत असतील.यात कोणी तालुक्यातच राहून कामकाज करत असेल आणि नागरिकांना वेळेवर सेवा देत नसेल, तर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नागरिकांना अडचण होणार नाही यासाठी सर्वांनी मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे. याबाबत लवकरच पाहणी करून कठोर निर्णय घेतले जातील."_
हेमंत गांगुर्डे
तहसीलदार एटापल्ली
0 Comments