मुलीला संधी देतो म्हणाले होते, पण सत्तेचा मोह सुटत नाही राजे अम्ब्रीशरावांची टीका : आत्राम पिता- कन्येचा वाद

मुलीला संधी देतो म्हणाले होते, पण सत्तेचा मोह सुटत नाही
राजे अम्ब्रीशरावांची टीका : आत्राम पिता- कन्येचा वाद


सिरोंचा : 
प्रत्येकवेळी ही शेवटची निवडणूक म्हणतात व पुन्हा-पुन्हा लढतात. मुलीला संधी देतो म्हणाले होते, पण स्वतःच लढण्याची घोषणा केली आहे. त्यांना सत्तेचा मोह सुटत नाही, अशी टीका माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली.
६ सप्टेंबरला आलापल्ली येथील जन सन्मान यात्रेच्या सभेत मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी कन्या भाग्यश्री आत्राम या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. आत्राम पिता कन्येच्या सत्तासंघर्षात अम्ब्रीशराव यांनी उडी घेतली. येथे ७ सप्टेंबरला अम्ब्रीशराव आत्राम यांनी पदाधिकारी

व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी अहेरी जिल्ह्याची निर्मिती करणे हे माझे स्वप्न असून मी राज्यमंत्री होतो तेव्हा हे काम अंतिम टप्प्यात होते. मात्र, मागील निवडणुकीच्या निकालामुळे ते काम रेंगाळले. त्यामुळे मतदारसंघाचा विकास खुंटल्याचा दावाही त्यांनी केला.
विकासकामांची कंत्राटे, तेंदूपत्ता, रेती याची ठेकेदारी मंत्र्यांच्या कुटुंबानाच हवी, त्यांना जनतेशी काही घेणेदेणे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. धर्मरावबाबा आत्राम व भाग्यश्री आत्राम यांच्यातील कथित वादावर अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाष्य केले.

Post a Comment

0 Comments