माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम आजमावणार स्वबळ, चामोर्शीतून फुंकणार जनकल्याण यात्रेतुन रणशिंग

माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम आजमावणार स्वबळ, चामोर्शीतून फुंकणार जनकल्याण यात्रेतुन रणशिंग

गडचिरोली :
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी   स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वबळावर लढणार असल्याचे सुतोवाच केले होते. १० ऑक्टोबरला सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यावर निशाणा साधल्याने ते चर्चेत आहेत. येत्या १२ ऑक्टोबरला चामोर्शी येथे राष्ट्रवादीच्या जनकल्याण यात्रेनिमित्त सभा आयोजित केली आहे. यानिमित्ताने धर्मरावबाबा हे शक्तिप्रदर्शन करणार असून या सभेतून ते निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मंत्रिपदाची संधी मिळालेल्या धर्मरावबाबा आत्राम यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मात्र स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाभर बैठका घेऊन स्वतंत्र मोर्चेबांधणी केली होती. जिल्हा परिषद अध्यक्षपद, नगरपालिकेत नगराध्यक्ष तसेच पंचायत समितीत सभापतीपदाचे आरक्षण जाहीर होताच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
जनकल्याण यात्रेतून ते आपली आगामी राजकीय रणनीती सर्वांसमोर मांडतील, अशी शक्यता आहे. जनकल्याण यात्रेच्या सभेसाठी त्यांनी भाजप, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) व काँग्रेस या पक्षांचा प्रभाव असलेले चामोर्शी हे तालुका मुख्यालय निवडले आहे. यातून ते एकाच दगडात तिघांवर निशाणा साधण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सभेने वाढविली उत्सुकता:

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या राजकीय रणनीतीला अधिक स्पष्टता देत जनतेत उत्सुकता निर्माण केली आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी १२ ऑक्टोबर रोजी चामोर्शी येथे भव्य जनकल्याण यात्रा सभा आयोजित केली आहे. या सभेत आमदार अमोल मिटकरी, महिला नेत्या रूपाली चाकणकर, तसेच अभिनेत्री अमृता खानविलकर उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments