काशीपूर -अंकोला (कुनघाडा) येथे दूषित पाणीप्राशनामुळे ५० जणांना विषबाधा – मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची तात्काळ दखल
चामोर्शी,
चामोर्शी तालुक्यातील मौजा-काशीपूर/अंकोला (कुनघाडा) येथे नळाची पाइपलाईन फुटल्याने नालीतील दूषित पाणी नळाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचले. हे पाणी पिल्यामुळे गावातील सुमारे ५० हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली असून, दुर्दैवाने १ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जवळपास ३० जणांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अजूनही रुग्णसंख्या वाढत आहे.
या गंभीर घटनेची माहिती भाजपा तालुका अध्यक्षा रोशनीताई वरघंटे व चामोर्शी नगरसेवक आशिषभाऊ पिपरे यांनी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांना कळविली. तत्काळ एक्शन घेत,मा.खा. डॉ. नेते यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार सोलंकी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यांनी सर्व भरती रुग्णांची योग्य काळजी घेण्याच्या व या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याच्या स्पष्ट सूचना अधिकारीवर्गाला दिल्या.
सध्या डॉ. नेते हे मुंबईत पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी व्यस्त असून, त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. “मुंबईहून परतल्यानंतर मी स्वतः गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची तसेच काशीपूर येथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करीन,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य विभाग व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
0 Comments