नगराध्यक्ष. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते नवजीवन व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राचे भव्य उद्घाटन
गडचिरोली,
समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असलेल्या नवजीवन व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन नवनिर्वाचित नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
गडचिरोली येथे व्यसनमुक्तीच्या आधुनिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. हे केंद्र मानवमित्र बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने संचालित करण्यात येणार आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर म्हणाल्या की, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी उपचारासोबत समुपदेशन, पुनर्वसन आणि सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक असून नवजीवन केंद्र ही या दिशेने एक आशादायी सुरुवात आहे. या उद्घाटन समारंभास आमदार डाॅ. मिलिंद नरोटे, नगरसेवक निखिल चरडे, अनिल पोहनकर, प्रशांत वरगंटीवार, रवी मसराम, सागर सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी या केंद्राच्या उपक्रमाचे कौतुक करत समाजोपयोगी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, समुपदेशक यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक उपचार पद्धती, मानसिक समुपदेशन, योग-ध्यान व पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे व्यसनग्रस्त व्यक्तींना नवजीवनाची नवी दिशा मिळणार आहे. हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून व्यसनमुक्त, सशक्त आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी मोलाचे योगदान देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

0 Comments