एकच ध्यास; आरमोरी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास- आमदार कृष्णा गजबे
आरमोरी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरण नूतनीकरणासाठी ८ कोटी मंजूर
आरमोरी:-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी 'एकच ध्यास; आरमोरी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास' या संकल्पनेतून अनेक विकास कामांचा धडाका लावला आहे. अशातच आमदार गजबे यांनी राष्ट्रीय महामार्ग आरमोरी ते गडचिरोली पर्यंत जाणाऱ्या मुख्य डांबरीकरण मार्गाची स्वतः पाहणी करून अडखडीत आणि लडखळीत झालेल्या मार्गासाठी जिल्ह्यातील तसेच बाहेर ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागू नये; ही कळकळ लक्षात घेता नुकतीच निविदा मंजूर करीत आरमोरी ते गडचिरोली डांबरीकरण मार्गाच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी मंजूर केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग भंडारा-देसाईगंज ते गडचिरोली जिल्ह्यापर्यंत जोडल्या गेलेला आहे. सध्या स्थितीत देसाईगंज - कुरखेडा, देसाईगंज-लाखांदूर, देसाईगंज-ब्रम्हपुरी मुख्य डांबरीकरण मार्ग सुकर झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आरमोरी ते गडचिरोली मार्गावर दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे सदर मार्गांवर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. खड्डे चुकवतांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशातही खड्ड्यांची डागडुजी केल्यास परत पुन्हा तीच अवस्था होऊ शकते; ही बाब आमदार कृष्णा गजबे यांच्या लक्षात येताच; त्यांनी डागडुजीला प्राधान्य न देता सरळ-सरळ नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला; त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग आरमोरी ते गडचिरोली पर्यंत जाणाऱ्या मुख्य डांबरीकरण मार्गासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून पोर्ला गावापासून कामासही सुरुवात करण्यात आली आहे. सदर कामामुळे वाहनधारकांचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.
0 Comments