महत्वाच्या निवडणुकांच्या काळात भाजपची धुरा युवा नेतृत्वाकडे
यशस्वी होण्याचा वाघरे यांना विश्वास
गडचिरोली : पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, विधानसभा आणि लोकसभा अशा अनेक निवडणुका आगामी दिड वर्षात होणार आहेत. अशा महत्वाच्या काळात भाजपने गडचिरोली जिल्ह्यात आपल्या पक्षाची धुरा प्रशांत वाघरे यांच्या खांद्यावर दिली. ओबीसी चेहरा आणि युवा व्यक्तिमत्व असलेल्या प्रशांत वाघरे यांचे ही जबाबदारी मिळाल्यानंतर शनिवारी गडचिरोलीत आगमन झाले. यावेळी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यातून आणि समन्वयातून ही जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू, पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
जिल्हाध्यक्षपदाची घोषणा झाली त्यावेळी वाघरे यांच्यासह काही पदाधिकारी जिल्ह्यातील प्रश्नांसाठी खासदार अशोक नेते यांच्यासोबत नवी दिल्लीत होते. तेथील कामे आटोपून शनिवारी ते सर्वजण गडचिरोलीत आले. त्यामुळे इंदिरा गांधी चौकात आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार अशोक नेते यांनी वाघरे यांची निवड एकमताने झाल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात भाजपला ओबीसी चेहऱ्याची गरज होती. ३३ वर्षांपासून पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळणारे वाघरे युवा असण्यासोबत अनुभवीही आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजप सर्व क्षेत्र काबिज करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आ.डॅा.देवराव होळी, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे यांनी पक्षाने एका कर्मठ कार्यकर्त्याला संधी दिली असून सर्वजण एकोप्याने काम करतील. कुठे काही कुरबूर असेल तर तीही दूर करण्यासाठी वाघरे सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त केला.
या भरगच्च पत्रपरिषदेला जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, योगिता पिपरे, रमेश भुरसे, डॅा.भारत कटी, मुक्तेश्वर काटवे, आशिष पिपरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments