महिलांची स्पर्धा जिंकण्याची धडपड कौतुकास्पद - माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

महिलांची स्पर्धा जिंकण्याची धडपड कौतुकास्पद -
माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे 

लोकमत सखी मंचच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम


गडचिरोली :
         लोकमत सखी मंचच्या होम मिनिस्टर कार्यक्रमातून महिला आपल्यातील कलागुण विकसित करीत आहेत हे आनंदाची बाब आहे. विविध स्पर्धांमध्ये महिला हिरहिरीने भाग घेऊन स्पर्धेत जिंकण्यासाठी जी धडपड करीत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना आपल्यातील कलागुण दाखवण्याची संधी मिळत आहे व स्पर्धांमध्ये त्या यशस्वी होत आहेत हे लोकमत सखी मंचाने सुरू केलेले कार्य अभिनंदनिय असून त्यांनी असेच कार्य नेहमी सुरू ठेवून महिलांच्या कलागुणांना व सांस्कृतिक गुणांना प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले. होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.
  लोकमत सखी मंच गडचिरोलीच्या वतीने आशीर्वादनगर गोकुळ नगर येथील शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर खुशबू निमजे (दुर्गे ) सामाजिक कार्यकर्त्या रोजा बारसागडे, लोकमत सखी मंचच्या जिल्हा  संयोजिका रश्मीताई आखाडे सहसंयोजिका भाग्यश्री गड्डमवार प्रामुख्याने उपस्थित होत्या.
     यावेळी उपस्थित महिलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यातून विजयी स्पर्धकांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या  होम मिनीस्टर कार्यक्रमातून महिलांनी आपले कलागुण  दाखवून स्पर्धेचा आनंद घेतला व होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment

0 Comments