कोरची तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत कृषीताईंचे तालुकास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

कोरची तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत कृषीताईंचे तालुकास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न
कोरची, 
  तालुका कृषी अधिकारी कार्यालय कोरची यांच्या वतीने आज दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालय कोरची येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत तालुकास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात कोरची तालुक्यातील पोकरा प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांतील सर्व कृषीताई सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी वडसा श्री. महेश परांजपे हे होते, तर तालुका कृषी अधिकारी कोरची श्री. नागेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रशिक्षक म्हणून मंडळ कृषी अधिकारी तथा तांत्रिक प्रशिक्षक श्री. अमोल जनबंधू यांनी तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सामाजिक प्रशिक्षक सौ. कांचन सहारे यांनी योजनेतील विविध कामांमध्ये कृषीताईंनी कृषी विभागाला कशा प्रकारे प्रभावी सहकार्य करावे, या बद्दल कृषीताईंना प्रशिक्षित केले.
प्रशिक्षणादरम्यान सर्व कृषीताईंना 'महाविस्तार AI' अॅप डाउनलोड करून देण्यात आले. हवामान अनुकूल शेतीच्या बाबींवर व्हिडिओ दाखवून तसेच प्रात्यक्षिकाद्वारे विश्लेषण करून मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे कृषीताईंना आधुनिक तंत्रज्ञान आणि हवामान आधारित शेतीची माहिती मिळाली.
कार्यक्रमाचे संचालन मंडळ कृषी अधिकारी श्री. ज्ञानेश्वर मसराम यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपकृषी अधिकारी, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी तसेच सहकारी कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
हा प्रशिक्षण कार्यक्रम पोकरा प्रकल्पाच्या उद्दिष्टांना चालना देणारा ठरला असून, ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.

Post a Comment

0 Comments