शेतकरी उत्पादक कंपन्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवी क्रांती घडवतील” – माजी आमदार कृष्णा गजबे

शेतकरी उत्पादक कंपन्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवी क्रांती घडवतील” – माजी आमदार कृष्णा गजबे

देसाईगंज : शेतकऱ्यांच्या संघटीत प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या देसाईगंज फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, कोंढाळाची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व शेतकरी नेते कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार कृष्णा गजबे म्हणाले की, “मी स्वतः एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या व त्यांचे प्रश्न चांगल्या प्रकारे ओळखतो. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारपेठेतील अस्थिरता या मोठ्या समस्या आहेत. यांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होणे अत्यावश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या या शेतकऱ्यांच्या भविष्याचा मजबूत पाया घालणाऱ्या संस्था आहेत. या कंपन्यांमुळे सामूहिक खरेदी-विक्री, शेतमाल प्रक्रिया, बाजारपेठेत थेट पोहोच आणि तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. यामुळे शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य मूल्य मिळते आणि त्यांचे जीवनमान उंचावते.

आजच्या काळात फक्त पिकवणे पुरेसे नाही, तर बाजारव्यवस्थेचे भान ठेवून काम करणे ही गरज आहे. आपण सारे शेतकरी एकत्र आलो तर बाजारातील आव्हाने आणि व्यापाऱ्यांची पकड कमी होईल. सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ अशा उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचे काम करतात. म्हणूनच शेतकरी भावंडांनी आपले मतभेद बाजूला ठेवत सामूहिक दृष्टीकोनातून कार्य केले, तर ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडू शकते, असे मार्गदर्शन गजबे यांनी केले. यावेळी कंपनीच्या वार्षिक अहवाल पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

शेतकरी सभासदांना मिळणार लाभांश

या सर्वसाधारण सभेमध्ये शेतकरी सभासदांना कंपनीतर्फे लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रतिशेतकरी 100 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभांश लवकरच जमा करण्यात येईल, असे अध्यक्षांनी आपल्या भाषणात सांगितले. या कार्यक्रमाला एनसीटी सचिव मूर्ती, जिल्हा कृषी अधीक्षक प्रिती हिरळकर, नोडल अधिकारी अर्चना कोचरे, बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक सतीश कुमार, सोनकुसरे, मदर डेअरीचे सुपरवायझर देवानंद मडावी, मिथुन मेश्राम, वसंत दोनाडकर, अमोल यादव, माजी महिला व बालकल्याण सभापती रोशनी पारधी, आत्मा बीटीएम रहांगडाले यांच्यासह कंपनीचे संचालक, सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय ग्रामपंचायत कोंढाळाचे उपसरपंच गजानन सेलोटे, पंढरी नखाते, तुळशीचे सरपंच चक्रधर नाकाडे, कोकडीचे सरपंच केवळराम टिकले, कुरूडचे उपसरपंच शंकर पारधी, तसेच कुरुड, कोंढाळा, शिवराजपूर, ऊसेगाव, फरी, तुळशी, कोकडी, किन्हाळा, मोहटोला या गावातील बरेच प्रगतशील शेतकरी व कंपनीचे शेअरधारक सभासद उपस्थित होते.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नव्या योजनांची आखणी करण्यात आली. कोंढाळा येथील ही सभा शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रगतीस दिशा देणारी आणि भावी कार्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments