जीएसटीची नवी रचना सर्वसामान्यांसाठी वरदान – आमदार डॉ. मिलिंद नरोटे


गडचिरोली, 
केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर
(जीएसटी) रचनेत केलेली दरकपात ही देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी ठरणार असून याचा थेट लाभ सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे," असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत बोलताना आ. डॉ. नरोटे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या जीएसटी पुनर्रचनेच्या संकल्पाचे आता प्रत्यक्षात रुपांतर झाले आहे. सध्याच्या चार स्तरातील कर रचनेऐवजी केवळ 18 टक्के आणि 5 टक्के अशा दोनच स्तरांत करआकारणी होणार आहे. त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान सुकर होणार आहे.
जीएसटीच्या नव्या करप्रणालीमुळे व्यापार क्षेत्राला चालना मिळेल, उत्पादन व मागणी वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीला बळ मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाला स्वातंत्र्यानंतर तब्बल 67 वर्षे संथ गतीने विकास करावा लागला, भ्रष्टाचार आणि महागाईने अर्थव्यवस्था डगमगली होती. मात्र 2014 नंतर मोदी सरकारने आर्थिक सुधारणांना वेग दिला. 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून देशात पारदर्शक करप्रणाली सुरु झाली असून आज 25 कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालून बाहेर आली आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था प्रगतीच्या मार्गावर असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा निर्वाळा आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांनी दिला आहे, असेही आ. डॉ.  नरोटे यांनी नमूद केले.
राज्यात सरकार कोणाचेही असो, जीएसटी दरकपातीचा लाभप्रत्येक राज्यातील कुटुंबाला, शेतकरी, मध्यमवर्गीय, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना होणार आहे. मोदी सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासाचे राजकारणच करत राहणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला, आ. डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बरसागडे, गडचिरोली शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा योगिताताई पिपरे, गीताताई हिंगे, डॉ. प्रिया खोब्रागडे तसेच आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments