अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान – आमदार रामदास मसराम यांची तातडीने पंचनाम्याची मागणी

 अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान – आमदार रामदास मसराम यांची तातडीने पंचनाम्याची मागणी 
गडचिरोली, 
गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कष्टाने पेरलेली पिके पावसाच्या तडाख्यामुळे जमिनीवरच पडून नष्ट झाली आहेत. आधीच उत्पादन खर्चाच्या वाढीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना या पावसाने त्यांचे जगणे आणखीन कठीण केले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आवाज उठविला आहे. त्यांनी तहसील प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या असून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले.
आमदार मसराम म्हणाले, “शेतकऱ्यांचे पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने त्वरित मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे. यासाठी झालेल्या पंचनाम्यांची यादी पारदर्शक पद्धतीने प्रकाशित करावी, जेणेकरून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही.”
तहसीलदारांना दिलेल्या सूचनांनुसार लवकरच सर्व बाधित शेतकऱ्यांची पाहणी करून पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याची सार्वजनिक यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक शेतकरी संघटनांनीही आमदारांच्या या भूमिकेचे स्वागत केले असून, शासनाने तातडीने पावले उचलून नुकसान भरपाई वितरीत करावी, अशी मागणी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतही शेती करत आहेत. मात्र, अवकाळी पावसाने त्यांचे स्वप्नच मोडून टाकले आहे. अशा परिस्थितीत शासनाने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments