अपघातग्रस्त शेतकऱ्याला रुग्णवाहिकेऐवजी खाटेवरून नेण्याची वेळ
तालुका प्रतिनिधि एटापल्ली
शशांक नामेवार
एटापल्ली,
आज सकाळी जारावंडी गावापासून अवघ्या १२ किमी अंतरावर असलेल्या पेंदुळवाही या छोट्याशा गावात एक गंभीर आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि दिरंगाई पुन्हा एकदा उजेडात आल्या आहेत.
मानिराम रामा हिचामी या 35 वर्षीय शेतकऱ्याने आज आपल्या शेतात धानाची रोवणी करण्यासाठी टॅक्टरच्या साहाय्याने चिखल तयार करण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान, चिखलात टॅक्टर घसरून अडकला आणि त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अचानक तो उलटला. या अपघातात मानिरामच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली. तो जोरात ओरडत असताना शेजारील शेतकरी धावत आले व तातडीने मदतीला पुढे सरसावले.
घटनेनंतर उपस्थित ग्रामस्थांनी लगेच रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र दुर्दैव असे की, जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात या गंभीर वेळेस एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे मानिरामला चक्क एका खाटेवर झोपवून 3 किलोमीटरचा खडतर जंगलमय रस्ता पार करून कसुरवाही गावापर्यंत आणण्यात आला तिथून वाहनाने जारावंडी रुग्णालयात नेण्यात आले. तिथून सामान्य रुग्णालया गडचिरोली येथे पाठवण्यात आले ही बाब प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि चिंताजनक आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात पुरेशी साधनसामग्री, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि वेळेवर मिळणाऱ्या रुग्णवाहिकेचा अभाव या समस्या वारंवार समोर येत असून यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो किंवा गंभीर आजाराच्या वेळी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो.
ग्रामस्थांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला असून तातडीने जारावंडी आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.
आदिवासी भागात रुग्णवाहिकेअभावी खाटेवरून रुग्णालयात प्रवास
आज शासन "सबका साथ, सबका विकास" अशी घोषणा देत अनेक योजना राबवत आहे, डिजिटल इंडिया, स्मार्ट व्हिलेज, आरोग्यवर्धिनी सेवा यांसारख्या मोठमोठ्या संकल्पनांची स्वप्ने पाहिली जात आहेत. पण वास्तवात मात्र, आदिवासी भागातील मूलभूत गरजाही पूर्ण केल्या जात नाहीत. पेंदुळवाहीतील अपघातग्रस्त शेतकऱ्याला रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे खाटेवरून जंगल पार करत रुग्णालयात न्यावं लागतं, ही बाब शासनाच्या दाव्यांवर मोठा प्रश्नचिन्ह उभं करते. ही केवळ दुर्लक्षिततेची नाही, तर आदिवासींच्या जीवनमूल्यांना कमी लेखण्याची गंभीर आणि दुःखद उदाहरण आहे. स्वप्नांची वाटचाल करताना जमिनीवरच्या वेदना विसरल्या जात असतील, तर ती वाटचाल अंतहीन काळोखात नेणारी ठरू शकते
0 Comments