पत्रकारांचे महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील - मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन
व्हॉईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनाला उत्कृष्ट प्रतिसाद
गडचिरोली : पत्रकारांच्या मानधनात महायुती सरकारने दुप्पट वाढ केली, पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे, अशी मागणी होती. त्यानुसार पत्रकारांचे महामंडळ तातडीने कार्यान्वित व्हावे, याकरता सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या सभागृहात ४ ऑगस्ट रोजी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने एक दिवसीय जिल्हास्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, विदर्भ विभागीय सचिव संजय पडोळे, इलेक्ट्रॉनिक मीडिया विंगचे राज्य प्रवक्ता महेश तिवारी उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार, जिल्हा कार्याध्यक्ष नसीर हाशमी यांनी मेहनत घेतली.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, माध्यमांचे स्वरुप बदलत आहे. डिजिटल माध्यमांमुळे लोकांना घटना, घडामोडींची माहिती तात्काळ होत आहे. जिल्ह्यात इंटरनेट व मोबाइल नेटवर्कचे जाळे वाढावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे सुमारे सातशे मोबाइल टॉवर मंजूर झाले आहेत. त्यापैकी साडेतीनशेहून अधिक टॉवर उभारण्यात आले असून उर्वरित काम युध्दपातळीवर सुरु आहे. या माध्यमातून दुर्गम, अतिदुर्गम भागात कनेक्टिव्हिटी वाढेल, यामुळे त्यांना विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल. पत्रकारांसाठी जिल्हास्तरावर भवन असावे, अशी मागणी आहे. यासाठी जागेचा शोध घ्या, भवन उभारुन तेथे पत्रकारांसाठी अद्ययावत सोयी-सुविधा पुरविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारितेतील योगदानाबद्दल महेश तिवारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी संघटनेची वाटचाल व पत्रकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पत्रकारांच्या हक्काची, त्यांच्यासाठी लढणारी ही संघटना असल्याचे त्यांनी नमूद केले.
विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी पत्रकारांचे आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. यावर संघटनेने काम केले. त्यातूनच माध्यमकर्मींचा दहा लाख रुपयांपर्यंतचा विमा काढण्यात आला. पत्रकारांसाठी निस्वार्थ भावनेने उभारलेला हा लढा असून यात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
महेश तिवारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार यांनी केले. या कार्यक्रमात राज्य सहकार्यवाहक संजय तीपाले, साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मुकुंद जोशी, साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई वंजारी, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष गणेश शिंगाडे, जिल्ह्यातील सर्वच जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तसेच सर्व व्हॉईस मिडीयाचे सदस्य उपस्थित होते.
पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य
या अधिवेशनात पत्रकारांच्या दहावी-बारावीतील गुणवंत पाल्यांचा सत्कार पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कीट भेट स्वरुपात देण्यात आली.
पत्रकारांना भेट वस्तू, शैक्षणिक किटसह आयुष्मान भारत कार्डचे वितरण
तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून पत्रकारांना भेट वस्तू देण्यात आले तर धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किट देण्यात आले. याचे वाटप कार्यक्रम संपल्यानंतर करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राज्य शासनाकडून आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देत पत्रकारांना आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आले.
0 Comments