पुरामुळे गडचिरोलीतील संपर्क तुटणारी गावे पूल आणि बारमाही रस्त्याने जोडणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

पुरामुळे गडचिरोलीतील
संपर्क तुटणारी गावे पूल आणि बारमाही रस्त्याने जोडणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार



गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अनेक विकास कामांचे लोकार्पण केले. गडचिरोलीच्या इतिहासात कोठी कोरनार या अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जाणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच वरिष्ठ लोकप्रतिनिधी ठरले आहेत. कोठी कोरणार येथे वीर बाबुराव शेडमाके पुलाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलामुळे छत्तीसगड राज्य तसेच 17 गावांना जोडण्यात येत आहे. पावसाळ्यात संपर्क तुटणारी गावे पूल आणि बारमाही रस्त्याने जोडण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सुरजागड येथे आयोजित कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, आ. डॉ. देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिना, पोलीस अधीक्षक निलोत्पल, लॉर्ड्स मेटलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन उपस्थित होते.

गडचिरोलीत 20 हजार कोटीच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे . त्यामुळे येथील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. खनिज वाहतूक आराखड्याला मान्यता देण्यात येईल. वाहतुकीचा एक चांगला कॉरिडॉर जिल्ह्यात उभा करण्याचा आपला प्रयत्न आहे. सुरजागड येथून निघणाऱ्या खनिजावर पहिला हक्क गडचिरोलीचा असून उद्योग उभारणी संदर्भात सर्वात पहिले जिल्ह्याचा व नंतर विदर्भाचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अहेरी येथे जिल्हा पोलीस संकुलात कॅन्टीन, वाचनालय, उद्यान आदींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस जवानांचा त्यांच्या हस्ते सत्कारसुद्धा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments