अवैध रेतीसाठा व बनावट दस्ताऐवजातून शासनाची दिशाभूल
- सामाजिक कार्यकर्ते ताटीकोंडावार यांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

गडचिरोली,
भामरागड तालुक्यातील येचली येथील इंद्रावती नदी रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला असता संबंधित कंत्राटदाराने येथून एकही रेती उचल न करता रेती वाहतूकीची टिपी येचली येथील दाखवून भामरागड, अहेरी तालुक्यातील नवनिर्माणाधिकन बांधकामासाठी चोरट्या मार्गाने रेतीचा वापर केला. यात अवैध रेतीसाठा करुन तसेच बनावट दस्ताऐवजाचा आधार घेत शासनाची दिशाभूल करीत कोट्यावधीच्या महसूलला चुना लावण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी नागपूर प्रशासकीय विभाग कार्यालयाचे विभागीय आयुक्त यांचेकडे केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता भामरागड तालुक्यातील येचली येथील इंद्रावती नदी रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला होता. प्रशासनाने ठरविलेल्या नियम व अटीनुसार 2120 ब्रास रेती उपसा करण्याचे आदेश महसूल विभागाच्या अधिका-यामार्फत मोजमाप करुन देण्यात आले होते. मात्र संबंधित कंत्राटदाराने येचली नदीपात्रातून रेतीचा उपसा न करताच भामरागड, अहेरी तालुक्यातील नवनिर्माणाधिन कामासाठी चोरट्याचा मार्गाने रेतीचा वापर केला. यामुळे जिल्हाधिका-यांच्या नियम, अटीला केराची टोपली दाखाविण्यात आली. यासंदर्भात तक्रार करताच यात 2115 रेतीचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. तर ताडगाव येथे भामरागड तहसिलदारांनी 563 रेतीचा अवैध साठा ठेवल्याप्रकरणी 1 कोटीवर दंडात्मक कारवाई केली. या प्रकरणातून नवनिर्माण बांधकामात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन करुन त्याचा वापर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विशेष चौकशी समितीचे नेमणूक करुन प्रत्येक रेतीसाठ्याची तपासणी केल्यास कोटीच्या घरात प्रशासनाला महसूल प्राप्त होऊ शकतो. 
त्यामुळे वरिष्ठ स्तरावरुन अवैध रेतीसाठा व बनावट दस्ताऐवज प्रकरणाची सखोल चौकशी करुन कर्तव्यात कसूर करणा-या अधिका-यांसह संबंधित कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करावी, अशीही मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवार समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी नागपूर विभागीय आयुक्त यांचेकडे तक्रारीवजा निवेदनातून केली आहे.

Post a Comment

0 Comments