जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा : डाव्या पक्षांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गडचिरोली : संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात परतीच्या प्रवासाने हाहाकार माजवला असून जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या धानाची कापणी केलेले संपूर्ण धान फसल पावसामुळे सडून नुकसान झाले आहे. शेतकरी तणसीलाही महाग झालेला असल्याने संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत याबाबत सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील १५ - २० दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे परतीच्या पावसाने हलक्या - मजव्या धानाची जिल्ह्यात नुकसान झालेली होती. सध्याच्या पावसाने सदरची नुकसान एवढ्या प्रचंड प्रमाणात झाली आहे की, कापणी केलेला धान पावसाने भिजल्याने उत्पन्न तर शुन्यच आहे, पण जनावरांना तणीस म्हणूनही ते उपयोगी रिहिलेले नाही. अशा स्थितीत पंचनामे आणि इतर शासकीय सोपस्कार पार न पाडता शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून संपूर्ण गडचिरोली जिल्हा सरसकटपणे दुष्काळग्रस्त घोषित करावा. व दुष्काळग्रस्तांना केंद्रीय आपदा नियमानुसार शेतकऱ्यांना मदत मिळवून दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा समिती सदस्य अशोक किरंगे, तालुका चिटणीस चंद्रकांत भोयर, भाकपचे शहर सचिव काॅ. संजय वाकडे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

0 Comments