अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – आमदार रामदास मसराम यांची जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी
शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याचे रक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.
गडचिरोली :
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतामध्ये उभे असलेले धान, तूर, सोयाबीन, भाजीपाला आदी पिके पावसामुळे आडवी झाली असून अनेक ठिकाणी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाला हातभार लावत जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्ह्यातील चारही तालुक्यांतील तहसीलदारांना यासंदर्भात तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आमदार मसराम म्हणाले की, “शेतकऱ्याच्या घामाने उभे केलेले पीक अवकाळी पावसामुळे नष्ट झाले आहे. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांवर आत्महत्येचे संकट ओढवू शकते. त्यांनी प्रशासनाला आवाहन केले की नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून प्रत्येक शेतकऱ्याचा योग्य हिशोब घेऊन त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.
तहसीलदार, कृषी अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी गावागावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे योग्य पंचनामे तयार करावेत, असे निर्देश आमदार मसराम यांनी दिले आहेत. त्यांनी सांगितले की, शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याचे रक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.
आमदारांच्या या पुढाकाराचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, आमदार मसराम हे नेहमीच शेतकऱ्यांच्या मागे उभे राहतात. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तत्काळ नुकसानभरपाईसाठी मागणी केल्याने आमच्यात दिलासा निर्माण झाला आहे.
प्रशासनाकडून पंचनामे प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून, लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 Comments