शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष - आ. रामदास मसराम यांची टीका
देसाईगंज आरमोरी
विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे यासह बोनस व खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची सर्रास लुट सुरू आहे. मात्र, याकडे शासन पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. विधानसभेत वारंवार प्रश्न उपस्थित करूनही शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. २५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या वरील समस्येचे निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार रामदास मसराम यांनी पत्रकारपरिषदेतून दिला आहे.
देसाईगंज तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धान खरेदी विक्री सोसायटीच्या माध्यमातून शासकीय हमीभावाचा लाभमिळावा, यासाठी नवीन खरेदी विक्री सहकारी संस्था निर्माण करून शासनाच्या उदीष्टाचे लक्षांक
गाठण्यासाठी या क्षेत्राचा आमदार म्हणून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या भागातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, यासाठी सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात धानाची विक्री केली. मात्र, खरीप हंगामासह
रब्बी हंगामाच्या धानाचे चुकारे अद्यापपर्यंत पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विधानसभेत या विषयी वारंवार प्रश्न उपस्थित केल्यानंतरही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. देसाईगंज तालुक्यात ३ कोटी ३६ लाख रुपये तर गडचिरोली जिल्ह्यात २० कोटी ३१ लाख रुपयाचे चुकारे शिल्लक आहेत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या हिताचे शासन असा कांगावा करणाऱ्या शासनाने खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहे. २०२५ च्या खताच्या आवंटनात १७३९५ मेट्रिक टन खताचे आवंटन असताना केवळ ११४७० मेट्रिक टन खताचा
पुरवठा झाल्याने कृषी केंद्रचालक प्रतिबॅग १०० रुपये ज्यादा दराने खत विक्री करून शेतकऱ्यांची सर्रास लुट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ही अतिशय गंभीर बाब असून २५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन उभारणार, असा इशारा आमदार रामदास मसराम यांनी दिला आहे.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते परसराम टिकले, तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, धनपाल मिसार, दिलीप घोडाम, विजय पिल्लेवान, अरुण कुंभलवार, कमलेश बारस्कर, विकास प्रधान, कैलाश वानखेडे, सागर वाढई आदी उपस्थित होते.
0 Comments