आगामी निवडणुकांमध्ये एकनिष्ठतेने कामाला लागा - प्रशांत वाघरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
भाजप गडचिरोली शहर कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत उत्साही वातावरण
गडचिरोली :- भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर कार्यकारिणीची विस्तारित बैठक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत नुकतीच जाहीर करण्यात आलेल्या शहर कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नियुक्तीपत्र आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या बैठकीला संबोधित करताना माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे म्हणाले की, "नेत्यांची निवडणूक पार पडली असून आता खरी निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांच्या योगदानामुळेच पक्ष मोठा होतो आणि त्यातूनच खरे नेतृत्व घडते. त्यामुळे आपण सर्वांनी आपसी मतभेद विसरून एकनिष्ठतेने काम करून नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपची सत्ता प्रस्थापित करावी.
ही निवडणूक केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी नाही, तर कार्यकर्त्याच्या अस्तित्वासाठी आहे. कार्यकर्त्यांनी आता आपली ताकद दाखवून द्यायची आहे. कारण नेता कार्यकर्त्यांमुळे घडतो, नेत्यामुळे नव्हे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जोमाने आणि समर्पित भावनेने निवडणुकीच्या कामात उतरावे," असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
या बैठकीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री गीता हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर येनगंदलवार, अनिल पोहनकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, राज्य परिषद सदस्य डॉ.चंदा कोडवते, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, रूपाली कावळे, महिला मोर्चा शहराध्यक्ष सीमा कन्नमवार व शहरातील विविध भागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा मोर्चा व महिला मोर्चाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments