राज्यातील एकमेव हत्तीकॅम्पला राज्य पर्यटनस्थळ घोषित करा
- संतोष ताटीकोंडावार यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
तालुका, प्र.शशांक श्रीहरी नामेवार
अहेरी,
आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील, अतिदुर्गम अशा कमलापूर येथे राज्यातील एकमेव हत्तीकॅम्प जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील पर्यटक, वन्यप्रेमींना आकर्षित करीत आले आहे. मात्र, या ठिकाणाला पर्यटनस्थळाचा दर्जा न मिळाल्याने या भागाचा फारसा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एकमेव हत्तीकॅम्पला राज्य पर्यटनस्थळ घोषित करुन या भागाचा विकास करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.
निवेदनात ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की, राज्याची संपूर्ण जबादारी सांभाळित असतांनाही आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छेने गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्विकारले ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करीत जिल्ह्यात मोठ-मोठे उद्योग उभारुन रोजगार निर्मितीचे नवीन दालन खुले केले आहे. मात्र, जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असल्याने तसेच तांत्रिक शिक्षणाअभावी स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे या बेरोजगारांना तांत्रिक ज्ञान देण्याची नितांत गरज आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे राज्यातील एकमेव हत्तीकॅम्प आहे. सन 2016 साली फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी हत्तीकॅम्पला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करीत विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा उपलब्ध करुन दिला होता. मात्र, 2019 मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. मध्यंती येथील हत्ती गुजरात येथे हलविण्याच्या हालचाली झाल्या. मात्र, वन्यप्रेमींकडून वाढता विरोध लक्षात घेत तसेच उच्च न्यायालयाने याची दखल घेतल्याने स्थलांतरण थांबले.
कमलापूर हत्ती कॅम्पमुळे स्थानिकांना रोजगाराचे मोठे स्त्रोत उपलब्ध होऊ शकते. या ठिकाणाला राज्य पर्यटनाचा दर्जा दिल्यास राज्य, देशासह परदेशातील पर्यटकांचा ओढा वाढून या भागात रोजगाराचे नवे दालन उघडले जाऊ शकते. तसेच येथे बोटींग, विश्रामगृह तसेच इतर सोयीसुविधा उपलब्ध झाल्यास राज्याच्या महसूलातही वाढ होऊ शकते. त्यामुळे राज्यातील एकमेवर हत्तीकॅम्पला राज्य पर्यटनाचा दर्जा देऊन या भागाच्या विकासाला चालना द्यावी, अशी मागणी ताटीकोंडावार यांनी निवेदनातून केली आहे.
0 Comments