मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन



गडचिरोली, 

सतत प्रगतिशील महाराष्ट्राच्या विकासात आणि गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक क्रांतीत एक नवा अध्याय सुरू करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार (ता. २२) कोनसरी येथे होणाऱ्या एका भव्य समारंभात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन तसेच कंपनीच्या भव्य एकात्मिक पोलाद प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी येथे ५ दशलक्ष टन प्रतिवर्ष (एमटीपीए) लोहखनिज ग्राइंडिंग प्लांटचा पहिला टप्पा, हेडरी-कोनसरी १० एमटीपीए क्षमतेची स्लरी पाइपलाइन आणि कोनसरी येथे ४ एमटीपीए क्षमतेच्या पॅलेट प्रकल्पाचे उद्घाटन करतील. याशिवाय मंगळवारी दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ते ४.५ एमटीपीए क्षमतेच्या भव्य एकात्मिक पोलाद प्रकल्पाचे, १००-खाटांच्या रुग्णालयाचे, सीबीएसई पद्धतीच्या शाळेचे भूमिपूजन करतील. सोमनपल्ली येथील एलएमईएलच्या कर्मचारी वसाहतीचेसुद्धा ते भूमिपूजन करतील. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अ‍ॅड. आशीष जयस्वाल; आमदार धर्मरावबाबा आत्राम; आमदार डाॅ. मिलिंद नरोटे, एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकित गोयल; जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे; पद्मश्री तुलसी मुंडा आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. गडचिरोलीच्या औद्योगिक विकासात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या काही वर्षांत, एलएमईएलने सुरजागड लोहखनिज खाणी आणि कोनसरी येथील डीआरआय तथा पेलेट प्रकल्प कार्यान्वयीत केल्यापासून स्थानिकांना मिळणाऱ्या रोजगारात लक्षणीय वाढ झाली आहे. रक्तरंजित हिंसेचा मार्ग सोडून शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांनाही कंपनीने उद्योग-केंद्रित कौशल्यांचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रक्रियेला मदत करण्यासाठी त्यांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले आहे. शिवाय या औद्योगिक क्रांतीने गडचिरोलीच्या विकासाला अभूतपूर्व चालना दिली आहे. श्री. बी. प्रभाकरन यांच्या मते, २२ जुलै २०२५ हा दिवस गडचिरोली तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे विदर्भाच्या भव्य एकात्मिक पोलाद प्रकल्पाची पायाभरणी झाल्यामुळे गडचिरोलीला देशाचे स्टील हब बनवण्याचे ऐतिहासिक स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले जात आहे. १४० वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी गडचिरोली हे भारतीय स्टील उद्योगाचे जन्मस्थान होऊ शकले असते. ती वेळ आज आली आहे. आता खऱ्या अर्थाने गडचिरोलीच्या उदयाची वेळ आली आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडला येथील औद्योगिक क्रांतीचा ध्वजवाहक असल्याचा अभिमान आहे. सुरजागड येथील लोहखनिज खाणींचे यशस्वी हरित संचालन, कोनसरी येथील डीआरआय आणि पेलेट प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, आता एकात्मिक पोलाद प्रकल्पाच्या रूपात एक मोठी झेप घेतली जात आहे. गडचिरोलीला महाराष्ट्रतील पहिला जिल्हा बनवण्यास मदत केल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि पाठिंब्याबद्दल, गडचिरोलीतील लोकांचे आणि आमच्या सर्व भागधारकांचे आभार मानतो. मंगळवारी गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत वाढीव योगदान आणि ‘ग्रीन स्टील’ बनवण्याच्या भारताच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेसाठी पायाभरणी केली जात आहे,असेही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments