तालुक्यातील कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची खुलेआम लूट बिल न देता अवाजवी दराने विक्री, कारवाहीची मागणी

तालुक्यातील कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची खुलेआम लूट
बिल न देता अवाजवी दराने विक्री, कारवाहीची मागणी



एटापल्ली

एटापल्ली तालुक्यात पावसाळ्याला सुरुवात झाली असून शेतकरी शेतीच्या कामासाठी सज्ज झाले आहेत. बळी राजाने पुन्हा एकदा आपल्या कष्टाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. शेतात वेळेवर पेरणी व्हावी यासाठी शेतकरी खते, बियाणे, औषधे, शेतीसाठी लागणारे विविध साहित्य खरेदीसाठी कृषी केंद्रांकडे धाव घेत आहेत. मात्र याच काळात काही कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरु असल्याचे समोर येत आहे.

तालुक्यातील अनेक कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांकडून बाजारभावापेक्षा जास्त किंमतीत खते आणि बियाणे विकले जात आहेत. ग्राहकांना कोणतेही पक्के बिल दिले जात नाही. जेव्हा शेतकरी बिल मागतात तेव्हा दुकानदार सरळ सांगतात की बिल पाहिजे असेल तर माल मिळनार नाही. काही ठिकाणी तर थेट धमकीच्या स्वरूपात बोलून शेतकऱ्यांना बिल न देताच माल दिला जात आहे.

या प्रकारामुळे शेतकऱ्यांना केवळ आर्थिक फटका बसत नाही तर पुढे ते मालाच्या गुणवत्तेवर प्रश्न देखील विचारू शकत नाहीत. कारण बिलच नसल्याने कोणतीही तक्रार स्वीकारली जात नाही. यातून अनेक वेळा शेतकऱ्यांच्या हातात निकृष्ट दर्जाचे खते, बियाणे आणि औषधे येतात आणि त्यामुळे पीक नाश होण्याचा धोका वाढतो.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे स्पष्ट नियम आहेत की कोणत्याही कृषी साहित्य विक्रेत्याने शेतकऱ्याला साहित्य विकल्यानंतर त्याचे बिल देणे बंधनकारक आहे. बिलावर मालाचे नाव, प्रमाण, दर आणि विक्रेत्याचा तपशील असणे गरजेचे आहे. मात्र एटापल्ली तालुक्यातील अनेक कृषी केंद्रे हे नियम सर्रास पायदळी तुडवत आहेत.

या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. पावसाच्या सरींसोबत शेतीच्या कामांना वेग द्यायचा असतो. पण खते, बियाणे, औषधे यासाठी दारोदारी भटकावे लागते आणि त्यातही या प्रकारची लूट सहन करावी लागते. शासनाच्या नावाने दुकानांवर मोठमोठे फलक झळकत असले तरी त्या दुकानांमध्ये शासनाच्या नियमांची अक्षरशः पायमल्ली होत आहे.

शेतकरी संघटनांनी आणि जागरूक शेतकऱ्यांनी यावर जोरदार आवाज उठवायला सुरुवात केली आहे. संबंधित कृषी केंद्रांची चौकशी करावी, बिल न देणाऱ्या आणि दरफासवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार साहित्य योग्य दरात मिळेल याची खातरजमा करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. जर तातडीने कारवाई झाली नाही तर तालुका कृषी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील शेतकरी संघटनांनी दिला आहे.


आम्ही खते आणि बियाणे घ्यायला गेलो, तेव्हा बिल मागितलं तर सरळ सांगितलं की बिल हवं असेल तर माल मिळणार नाही. दरही खूप जास्त सांगितला. काही विचारलं तर उडवाउडवीची उत्तरं मिळाली. आम्ही शेतकरी आहोत म्हणूनच हे सगळं सहन करावं लागतं. जर काही प्रॉब्लेम झाला तर कोणाकडे जायचं? बिलच नसेल तर तक्रार कशी करायची? आमचं कोण ऐकून घेणार?

संजय कुडयामी,शेतकरी

Post a Comment

0 Comments