गडचिरोली जिल्ह्यात आदिवासीबहुल क्षेत्रात जीवनावश्यक औषधीयुक्त वनस्पती साठा

आदिवासीबहुल क्षेत्रात औषधीयुक्त वनस्पती

डॉ. कैलास व्हि. निखाडे, निसर्ग अभ्यासकभामरागड :
गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात समर्थक लोक आश्रय घेतात. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१2 चौ.कि.मी आहे. या जिल्हयांतील भामरागड तहसिल हे आदिवासी भाग आहे. गडचिरोली हा वनांनी नटलेला जिल्हा असून येथील वनामध्ये मोठ्या प्रमाणावर औषधीयुक्त वनस्पती आहे. या वनस्पतींची ओळख व्हावी आणि वन औषधी संबंधात काम करणारे वैद्य तसेच विद्यार्थी व अभ्यासक यांना माहिती उपलब्ध व्हावी तसेच वन‍औषधी रोपे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली येथील स्मृती उद्यानात दोन हेक्टर क्षेत्रावर राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्या अर्थसहाय्याने औषधी वनस्पती उद्यान (हर्बल गार्डन) तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये १६ वृक्ष प्रजाती, ८ प्रजाती आणि १३ वेल प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. वृक्ष प्रजातीमध्ये अर्जुन, बेहडा, अंमलतास, कांचन, शिकेकाई इ. श्रब प्रजातीमध्ये बिवसा, अडूळसा, निर्गुडी, पांबर, पारिजातक, इतर हर्ब प्रजातीमध्ये वेखंड, कोरफड, गवती चहा, सप्तश्री इत्यादी, वेल प्रजातीमध्ये शतावरी, पिंपळी, हाडजोड, गुरुवेल, इकडोढी व गुंजा इत्यादीचा समावेश आहे. मानव जातीसाठी निसर्गाने अनेक वरदाने दिले आहेत. त्यात वनस्पतीचा हि समावेश आहे. निसर्गाने येथील मानवाला उपलब्ध करून दिलेला वनौषधी खजिना म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे. निसर्गाने ज्या औषधी वनस्पती निर्माण केल्या आहेत त्या आजूबाजूला, जंगलात आणि परिसरात असतात. फक्त अपल्याला त्याची ओळख नाही. अशा वनस्पती ओळखता आल्या, त्यांच्या गुणधर्मांची माहिती झाली तर विविध व्याधीवर त्याचा उपयोग होऊ शकतो. रोग निदान खरे असेल आणि त्यावर योग्य वनस्पती औषधाचा उपाय केला तर शीघ्र लाभ दिसून येतो. ताज्या वनस्पतीचा फार लवकर फायदा होतो. म्हणूनच सामान्य जनतेला वन औषधींचे गुण व उपयोग याची माहिती होणे अत्यंत आवश्यक आहे. आज ही आदिवासीबहुल क्षेत्रात वन‍औषधीची जाण असणाऱ्याकडून अनेक व्याधीवर उपचार केले जातात. मात्र आजपर्यंत अशा वनौषधीवर संशोधन झालेले आढळून येत नाही. वनौषधीचा फायदा जरी झाला नाही तरी अपाय मात्र फार कमी होतो. म्हणूनच की काय आयुर्वेद औषधी घेण्याकडे रुग्णाचा कल दिवसेंदिवस वाढताना दिसून येतो. गडचिरोलीच्या जंगलात व परिसरात अनेक कंदमुळे, भाज्या, फळझाडे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत. जसे हरदुलीचे कांदे, मटाळू, ममनाल, अंबाडी, पुर्णवा, तांदुळजा, मोह, चार, आवळा, टेंभरुण, आदि विविध वनस्पती, वेलीयुक्त वन‍औषधी ह्या सर्वाचा उपयोग स्वास्थ संवर्धनासाठी करुन घेतल्यास कुपोषणासारख्या प्रश्नावर पर्याय ठरु शकतो. कमीत कमी पैशात उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करुन आपले आरोग्य व पैशाची बचत होऊ शकते. यावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण केल्यास रोजगाराला मदत होऊ शकते. येथील जंगलातील व परिसरतील असलेल्या वन औषधीचे शास्त्रोक्त पद्धतीने संकलन करुन वन‍औषधीचा उपयोग करणाऱ्या उद्योगांना संधी दिल्यास हा एक नियमित वनाधारित रोजगार निर्मितीचे प्रमुख साधन म्हणून खेड्यातील जनतेसाठी उपलब्ध होऊ शकेल. येथील आदिवासी जगात अनेक वर्षापासून पारंपरीक वन औषधीचा उपयोग करीत असल्याचे आढळून येते. त्यात प्रामुख्याने सर्पदंश, पिसाळलेला कुत्रा चावणे, हाड मोडणे एवढेच नव्हे तर कर्क रोगासारख्या असाध्या आजार यावर वन‍औषधीचा उपयोग केला जात आहे. अन औषधीवर प्रक्रिया करण्याचे शिक्षण येथील सुसिक्षित व बेरोजगार युवकांना दिल्यास छोटे प्रक्रिया उद्योग सुरु होऊ शकतात. यामध्ये वन‍औषधीची ओळख व हर्बेरियल तयार करण्यासाठी वन‍औषधीची लागवड व संवर्धन करणे आवश्यक आहे. तसेच औषधीची विक्री व्यवस्था याबाबी करता येऊ शकतात. जिल्ह्यात काही समाज सेवी संस्था अनेक दिवसापासून या क्षेत्रात काम करीत आहेत. त्याचा उपयोग या जिल्ह्यासाठी निश्चितच लाभदायी ठरु शकते. येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या विशेष प्रयत्नाने जंगलातील विविध वन‍औषधी गोळा करुन त्याची लागवड कॉम्पलेक्स परिसरातील स्मृती उद्यानात केल्यामुळे दिवसेंदिवस नष्ट होत चाललेल्या वन‍औषधीचे लागवड व संवर्धनाच्या दृष्टीने उचललेले एक चांगले पाऊल ठरले आहे.

Post a Comment

0 Comments