ना हरकत प्रमाणपत्राविनाच बंधा-याचे बांधकाम - सिरोंचा वनविभागातील प्रकार; चौकशीची मागणी

ना हरकत प्रमाणपत्राविनाच बंधा-याचे बांधकाम
- सिरोंचा वनविभागातील प्रकार; चौकशीची मागणी


सिरोचा,
सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या अनेक दुर्गम भागात संबंधित विभागाच्या वतीने वनविभागाच्या हद्दीत नाल्यांवर बंधारे बांधकाम करण्यात आले आहेत. यातील काही बंधा-याचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र सदर बंधारे नाहकरत प्रमाणपत्र न घेताच बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सदर प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
जलसंधारण विभागांतर्गत सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या रायमगट्टा, सुरय्यापल्ली, जिमलगट्टा, मेडपल्ली, पेंटीपाका, पोचमपल्ली आदींसह इतर ठिकाणी बंधा-याचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकाम वनजमिनीवर आहे. सदर बंधारे बांधकाम करतांना वनविभागाने बांधकामाला परवानगी दिली काय? बंधारे बांधकामादरम्यान नियम व अटींचे पालन वृक्षांचे नुकसान टाळण्यात आले आहे काय? असे प्रश्न निर्माण होत आहे. प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता कामाच्या स्थळी अनेक झाडांच्या मुळांसह खोडांना नुकसान केले असल्याचे मौका पाहणीदरम्यान दिसून येत आहे. त्यामुळे सिरोंचा वनविभागाच्या वरिष्ठांनी बांधकामस्थळी चौकशी केल्यास यात मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे. वनविभागाच्या वरिष्ठांनी बंधारे बांधकामाची सखोल चौकशी करुन संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

Post a Comment

0 Comments