तवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर नाही - पुणे खंडपीठाचा निर्णय

गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर नाही - पुणे खंडपीठाचा निर्णय
गडचिरोली,
सहकारी पतसंस्थांना आता बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर यापुढे प्राप्तिकर द्यावा लागणार नाही असा निर्णय प्राप्तिकर अपलीय प्राधिकरणाच्या पुणे खंडपीठाने नुकताच दिला असून या निर्णयामुळे राज्यातील सर्व सहकारी पतसंस्थांना दिलासा मिळणार असल्याचे सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे मानत सचिव प्रा. शेषराव येलेकर यांनी सांगितले आहे.
     महाराष्ट्रातील 23 पतसंस्थांनी 2017- 18 चे प्राप्तेकर विवरण पत्र भरताना गुंतवणुकीवरील व्याजावर प्राप्तिकरातून सूट मागितली होती. प्राप्तिकर कायदा 80 पी अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांमधील गुंतवणुकीवर व्याज करमुक्त आहे, मात्र प्राप्तिकर विभागाच्या मुख्य आयुक्तांनी शासनाचा महसूल बुडवला जातोय  असे सांगत पतसंस्थांनी गुंतवणुकीवरील व्याजावर प्राप्तिकर भरलाच पाहिजे असा आदेश दिला होता, त्यासाठी त्यांनी प्राप्तिकर कलम 263 चा दाखला दिला होता. या अन्यायविरुद्ध पतसंस्थांनी प्राप्तिकर अपिलीय प्राधिकरणाच्या पुणे खंडपीठाकडे दाद मागितली होती त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वात आवाज उठविला होता. पुणे खंडपीठाच्या या निर्णयामुळे पतसंस्थांच्या लढ्याला यश आले असून पतसंस्थांकडे असलेल्या सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीचा हा विजय असल्याची भावना राज्यभरातील पतसंस्था व्यक्त करीत आहे.
    प्राप्तिकर विरोधातली एक मागणी पूर्ण झाली असली तरी दुसरी मागणी अजून प्रलंबित आहे ती म्हणजे पतसंस्थांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या उत्पन्नावर प्राप्तिकर सवलत मिळाली पाहिजे. सेक्शन 194 प्रमाणे एक कोटी रुपयांच्या पुढे रक्कम बँकेतून काढल्यास त्यावर एक ते दोन टक्के टीडीएस कापल्या जातो पतसंस्थांना प्राप्तिकर माफी असेल तर टीडीएस कापण्याचे कारण काय ? यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचा लढा सुरूच राहणार असून यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडे (सीबीटीडी) दाद मागणार असल्याचे  राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी सांगितले आहे.
      सहकारी पतसंस्थांनी बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर माफी मिळाल्याबद्दल विदर्भ पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, गडचिरोली जिल्हाध्यक्ष दिलीप खेवले तसेच मानद सचिव व सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर  यांनी आनंद व्यक्त केला असून त्यांनी पुणे खंडपीठाचे  आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments