देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांसह उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन

देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांसह उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन

आमदार कृष्णा गजबेंच्या कार्यकाळातील मोठी उपलब्धी


देसाईगंज-
     आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या तब्बल ७६ वर्षानंतर येथील बसस्थानकाच्या बांधकामास गती मिळवून देण्यात यश मिळवल्यानंतर देसाईगंज शहरासह लगतल्या तालुक्यातील रुग्णांना उपचारावर करावा लागत असलेला खर्च व एकुणच तालुक्यातील नागरीकांची आर्थिक स्थिती पाहु जाता येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात यावे,या मागणीला घेऊन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी सातत्याने सुरु ठेवलेल्या पाठ पुराव्यास अखेर यश आले असुन देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांसह उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आल्याचे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संबंधित विभागास पत्रच धडकल्याने आमदार गजबे यांच्या कार्यकाळातील ही फार मोठी उपलब्धी असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.
     अतिदुर्गम, आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहर हे व्यापार नगरी म्हणून सर्वदूर परिचित आहे.देसाईगंज शहर हे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले शहर असून लगतच अर्जुनी,लाखांदुर,कुरखेडा, ब्रम्हपुरी,आरमोरी असे एकुण पाच तालुके आहेत.या पाचही तालुक्यातील मोठ्या प्रमाणात ग्राहक देसाईगंज येथील बाजारपेठेतच खरेदीसाठी येत असल्याने व दरम्यान काही अनुचित घटना घडल्यास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात.मात्र ग्रामीण रुग्णालय असुनही गंभीर स्थितीत रुग्णास रेफर टु गडचिरोली अथवा नागपुर करण्यावाचुन पर्याय उरत नव्हता.
    देसाईगंज शहर हे नगर परिषद क्षेत्रात येत असुन शहराची लोकसंख्या जवळपास ४५ हजाराच्या घरात असुन येथे केंद्रीय राखीव दल तसेच राज्य राखीव दलाचे मुख्यालय असुन सदर पोलीस वसाहतीतील पोलीस जवान व त्यांचे कुटुंबीय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत असतात.येथिल रुग्णालयात लागुन असलेल्या दोन राष्ट्रीय महामार्ग तसेच तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येत असलेल्या जवळपास दिड ते दोन लाख लोकांचा भार आहे.तसेच या परिसरात नक्षली कारवायांत जखमी झालेल्या जवानांना सदर रुग्णालयातच दाखल केले जात आहे.
    तथापि ग्रामीण रुग्णालय हे केवळ ३० खाटांचे असल्याने रुग्णांना सेवा देतांना अस्तित्वात असलेल्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊन बरेचदा रुग्णालयात प्रशासनाला रुग्ण व नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.या करीता देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी संबंधित  विभागास निर्देशीत करण्याची मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी ३ जुलै २०२४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे केली होती.त्या अनुषंगाने येथील समस्या लक्षात घेता राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे शासन निर्णय क्रमांक: स्थापना.२०२३ /प्र.क्र.२०२/आरोग्य-३ दि.४ ऑक्टोबर २०२४ रोजी संबंधित विभागास धडकले असुन येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आल्याने आमदार गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार तसेच आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत यांचे आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments