धान्य वितरणात अडथळा
गडचिरोली, धान्य वितरणात पारदर्शकता यावी, यासाठी प्रत्येक दुकानदाराला पॉस मशील उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र सदर मशीन व्यवस्थित काम करीत नसल्याने धान्य वितरणात अडथळे निर्माण होत आहेत.
पॉस मशीनवर लाभार्थ्यांचा अंगठा घेतल्याशिवाय धान्य वितरण करता येत नाही. यामुळे धान्य वितरणात कमालीची पारदर्शकता आली आहे. मात्र दुसरीकडे पॉस मशीन गतीने काम करीत नसल्याने दुकानदार व ग्राहक त्रस्त झाले आहेत. सदर मशीन ऑनलाइन काम करते. पुरवठा विभागाच्या धान्य वितरणाच्या साईटसोबत ही मशीन जोडली आहे. वेबसाईट स्लो राहत असल्यानेही पॉस
मशीन काम करीत नसावी, अशी शंका आहे. एका लाभार्थ्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळपास 10 मिनीटांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे तासभरात केवळ 7 ते 8 लाभार्थ्यांना धान्य वितरण होत आहे. परिणामी रेशन दुकानात लाभार्थ्यांची मोठी रांग पहावयास मिळत आहे. पॉस मशीन बदलवून द्यावा, या ठिकाणी फोर-जी सेवा असलेली मशीन द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे गडचिरोली विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके यांनी केली आहे. दिवसाची मजुरी सोडून लाभार्थ्यांना रेशनसाठी दुकानात थांबावे लागत आहे. त्या दिवशी रेशन न मिळाल्यास पुन्हा दुसऱ्या दिवशीची मजुरी बुडवून धान्याची जावे लागते.
0 Comments